इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) महाराष्ट्रातील ८९ संस्थांना प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढले आहे. यात डिप्लोमा इन फार्मसीच्या ७१ संस्थाच्या आणि पदवीच्या १८ संस्थाचा समावेश आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत तंत्रशिक्षण संचालनालयाने या संस्था निकष पूर्ण करत नसल्याचा अहवाल पीसीआयला पाठवला होता. पीसीआयने या अहवालाची दखल घेत ही कारवाई केली आहे.
या अहवालात अग्निसुरक्षा प्रमाणपत्र न घेणे, भोगवटा प्रमाणपत्र नसणे, प्रयोगशाळांची संख्या कमी असणे, पीसीआयच्या निकषांपेक्षा कमी कर्मचारी संख्या असणे अशा अनेक गोष्टी आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
कोरोनानंतर राज्यातील फार्मसी महाविद्यालयात विदयार्थ्यांचा ओढा वाढला. त्यानंतर महाविद्यालयाची संख्याही हळूहळू वाढू लागली. गेल्या तीन वर्षात पीसीआयने डिप्लोमाच्या २२० आणि पदवीच्या ९२ नव्या महाविद्यालयांना परवानगी दिली. या संस्था सर्व निकष पूर्ण करतात का हे तपासण्यात आले. त्यानंतर जे निकष पाळत नाही त्या संस्थावर कारवाई करण्यात आली.