मुंबई – ऑनलाइन आर्थिक व्यवहाराचे प्रसिद्ध प्लॅटफॉर्म समजल्या जाणार्या पेटीएमच्या प्राथमिक समभाग विक्रीला (आयपीओ) कमी प्रतिसाद मिळाला असला तरी लिस्टिंगच्या आधीच कंपनीने ३५० कर्मचार्यांना कोट्यधीश बनविले आहे. पेटीएमच्या २.५ अब्ज डॉलरच्या आयपीओनंतर ३५० कर्मचार्यांच्या मालमत्तेची रक्कम एक कोटी रुपये असेल. यामध्ये कार्यरत आणि निवृत्त कर्मचार्यांचा समावेश आहे. हे कर्मचारी पेटीएममध्ये गुंतवणूकदार आहेत.
पेटीएमचे आयपीओच्या शेअर्सचे वाटप १५ नोव्हेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. कोणाला पेटीएमचा आयपीओ मिळेल अथवा नाही, हे या दिवशीपर्यंत कळेल. शेअर बाजारात पेटीएमची १८ नोव्हेंबरला लिस्टिंग होणार आहे. या दिवशीच आयपीओ घेणार्या गुंतवणूकदारांच्या मिळकतीचा हिशेब समजेल. या आयपीओच्या माध्यमातून पेटीएम १८,६०० कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे.
पेटीएमने आयपीओसाठी २,०८० पासून २,१५० रुपये प्रति शेअर असे मूल्य निश्चित केले होते. एका लॉटमध्ये कंपनीचे सहा शेअर्स होते. मूल्य कक्षेच्या वरच्या स्तरावर कंपनीचे मूल्यांकन १.३९ लाख कोटी रुपये आहे. त्यामुळे पेटीएमला सर्वात मोठा आयपीओ मानला जात आहे. यापूर्वी कोल इंडियाचा आयपीओ १५,००० कोटी रुपये होता.
पेटीएम हे मोबाइल वॉलेट अॅप आहे. त्यावर सध्या ३० कोटी ग्राहक आहेत. फोर्ब्स इंडियाच्या अहवालानुसार, मार्च २०२१ पर्यंत पेटीएमच्या माध्यमातून दर महिन्यात ७५ कोटीपासून ८० कोटीपर्यंत ट्रॅन्झॅक्शन होत होते. म्हणजेच ६५ हजार कोटी रुपयांहून अधिक ट्रॅन्झॅक्शन होत होते.








