मुंबई – डिजीटल पेमेंटला घाबरणारे लोकही गेल्या सहा महिन्यांमध्ये ऑनलाईन सुविधा वापरायला लागलेले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संक्रमणाने लोकांना सारे काही शिकवले आहे. अशात खर्च वाढला, महागाई वाढली. त्यामुळे कर्जाची डिमांडही वाढली. त्यामुळे पेटीएमने (Paytm) एक नवी सुविधा सुरू केली आहे. केवळ दोन मिनीटांत पर्सनल लोन देण्याची घोषणा केली आहे.
या सुविधेचा लाभ वर्षभर कोणत्याही दिवशी आणि २४ तासात कोणत्याही क्षणी घेऊ शकता येणार आहे. अक्षरशः सुटीचे दिवस असो वा रविवार असो अर्ज करा आणि दोन मिनीटांत पर्सनल लोन मिळवा, अशी ही सोय असेल. यासाठी दोन मिनीटांपेक्षाही कमी वेळ लागणार आहे. पेटीएमची क्रेडीट सर्व्हिस सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कंपनीने ही सोय उपलब्ध करून दिली आहे. पेटीएमचे सीईओ भावेश गुप्ता यांनी सांगितले की स्वयंरोजगारीत लोकांपर्यंत ही सुविधा पोहोचविणे आपला मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून ते आवश्यक खर्च पेटीएमद्वारे प्राप्त करू शकतील. याशिवाय युवा उद्योजकांनाही कमी तसेच मध्यम कालावधीसाठी कर्ज देण्याचीही सोय पेटीएमने केली आहे.
पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, कर्जाची रक्कम १८ ते ३६ महिन्यांमध्ये चुकविता येणार आहे. नोकरदार, छोटे व्यवसायिक आदींसाठी ही अत्यंत सोयीची बाब असणार आहे. पेटीएमच्या फायनांशियल सर्व्हिस सेक्शनमध्ये जाऊन त्यानंतर पर्सनल लोनवर क्लिक करून पुढील प्रक्रिया पार पाडता येणार आहे. पेटीएमने ही सुविधा देण्यासाठी एनबीएफसी तसेच बँकांसोबत करार केला आहे. आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक ग्राहकांना लोन देण्यात सुद्धा आले आहे. मात्र आता १ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना कर्ज देण्याची तयारी असल्याचे पेटीएमचे म्हणणे आहे. कर्जाचे खाते थेट पेटीएम अॅपद्वारे वापरता येणार आहे. सध्या देशातील ११ भाषांमध्ये हे अॅप उपलब्ध आहे.