पुणे – नेहमीच वादग्रस्त विधाने करणा-या अभिनेत्री पायल रोहतगीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्यामुळे तिच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. या व्हिडिओमुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पायल रोहतगी इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक मुद्द्यांवर आपली मते व्यक्त करते. परंतु या वेळी तिच्या व्हिडिओमुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयए वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने पुण्यात तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आली आहे.
पुणे जिल्हा काँग्रेसच सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफचे फोटो शेअर करून ती नुकतीच चर्चेत आली होती. “प्रत्येक जण अशी सुरुवात करतो, सलमान खानची अभिनेत्रीसुद्धा.” असे तिने लिहिले होते.
गेल्या वर्षीही असाच गुन्हा
गेल्यावर्षी पायल रोहतगी नेहरू कुटुंबियांविरुद्ध अपमानजनक भाषा वापरल्यामुळे चर्चेत आली होती. तेव्ही तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये जवाहरलाल नेहरू, त्यांचे वडील मोतीलाल नेहरू आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली होती. राजस्थान पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला जामीन मिळाला होता.