मुंबई – सोनी टीव्ही वरील रियालिटी शो बद्दल अनेक प्रेक्षकांना खूपच आकर्षण असते, विशेषत : गायनाच्या कार्यक्रमातील रंगतदार स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये कोण विजेता ठरतो याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते. सोनी वाहिनीवरील ‘इंडियन आयडॉल ‘ या कार्यक्रमाला चांगलीच प्रसिद्ध मिळाली आहे. हा गायन रियालिटी शो म्हणजेच ‘इंडियन आयडॉल’ चा १२ वा सीझन रविवारी संपला आहे. स्वातंत्र्यदिनी याचा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता, यामध्ये अन्य स्पर्धकांना मागे टाकत उत्तराखंडचा पवनदीप राजन हा विजेता ठरला असून त्याने २५ लाखांचे बक्षीस व आलिशान कार जिंकली आहे.
पवनदीप राजन याने इतर पाच स्पर्धकांना हरवून ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. वास्तविक कोरोना काळात हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून अनेक वेळा वाद झाला. कोरोनामुळे देखील या कार्यक्रमावर परिणाम झाला, कारण कधी स्पर्धक कोरोना पॉझिटिव्ह झाले तर कधी सेटचे लोकेशन बदलावे लागले. अशा प्रकारे अनेक अडचणी असूनही या शो ने लोकांची मने जिंकली आणि शेवटी १५ ऑगस्टला याचा यशस्वी समारोप झाला.
‘इंडियन आयडॉल च्या १२ व्या पर्वात ( सिझन ) सहा स्पर्धकांनी अंतिम फेरी गाठली होती. यात पवनदीप शिवाय अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, मोहम्मद दानिश, निहाल आणि षण्मुखप्रिया याचा सहभाग होता. दुसरे स्थान मिळवलेल्या अरुणिताला शो जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार म्हटले जात होते. मात्र पवनदिपने बाजी मारली. तिसऱ्या क्रमांकावर सायली कांबळे, चौथ्या क्रमांकावर मोहम्मद दानिश, पाचव्या क्रमांकावर निहाल आणि सहाव्या क्रमांकावर षण्मुखप्रिया होत्या.
पवनदीप म्हणाला की, ‘इंडियन आयडॉल एक व्यासपीठ असून येथे कलाकारांना खूप आदर मिळतो. संपूर्ण शो दरम्यान, अनेक गाणी गायली गेली, सर्वोत्कृष्ट जज् आणि प्रसिद्ध पाहुणे यात आले होते, मी त्या सर्वांचा आभारी आहे, शोमध्ये इतके महिने घालवल्यानंतर, आम्ही आता प्लेबॅकसाठी तयार झालो आहोत.
‘इंडियन आयडॉल १२वा सिझन’ चा नोव्हेंबर २०२० मध्ये प्रीमियर झाला होता. तेव्हा पासून स्पर्धा रंगत गेली, अखेर काल मूळचा उत्तराखंडचा असलेला पवनदीप राजन याने या शोची ट्रॉफी जिंकली आहे. बक्षीस म्हणून त्याला ट्रॉफी, २५ लाख रुपये रोख आणि कार देण्यात आली. विशेष म्हणजे १२ तास चाललेल्या अंतिम फेरीच्या शोमध्ये अतिथी म्हणून कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा द ग्रेट खली उपस्थित होते. तर हिमेश रेशमिया, सोनू कक्कर आणि अनु मलिक या शोचे जज होते. आदित्य नारायण याने ‘इंडियन आयडॉल’ च्या या सीझनचे सूत्रसंचालन केले.