खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश; महिनाभरात प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात
नाशिक : गेल्याअनेक वर्षांपासून सातपूर येथील प्रस्तावित पोस्ट ऑफिस इमारत उभारणीचा प्रस्ताव विविध परवानगींसाठी शासन दरबारी रखडला होता. याची गंभीर दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी पोस्ट ऑफिस इमारत उभारणीसाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या ना हरकत दाखले मिळविले आहेत. खा. गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नातून सातपुर येथील प्रस्तावित पोस्ट ऑफिस इमारत उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून इमारत बांधणीची वर्कऑउट ऑर्डर निघाली आहे. येत्या महिनाभरात प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ होणार असल्याने सातपुरकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातपूर येथील भाजी बाजार परिसरात डाक विभागाचा भूखंड आहे. या भूखंडावर पोस्ट कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी म्हाडा आणि नाशिक महानगरपालिकेच्या विभागाकडून ना हरकत दाखल अवश्यक होते. मात्र या विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे पोस्ट ऑफिस इमारत उभारणीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. या परिसरात पोस्ट कार्यालयाची स्वत: मालकीची इमारत नसल्यामुळे या परिसरातील एका संस्थेच्या इमारतीत सदर पोस्ट कार्यालय कार्यान्वित होते. याठिकाणी ग्राहकांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे व जागेअभावी अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे नागरिकांची कुचंबना होत होती. पोस्ट ऑफिसला पुरेशी जागा नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामाना करावा लागत होता. दरम्यान प्रस्तावित पोस्ट ऑफिसची इमारत उभारणीकामी लागणाऱ्या ना हरकत परवानगी मिळवून द्याव्यात, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून डाकघर विभागाचे डाकघर अधीक्षक मोहन अहिरराव तसेच सातपुर येथील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेवून साकडे घातले होते.
सातपूर परिसरात डाक विभागाचे कार्यालय स्वत:च्या जागेत प्रशस्त असे असावे, ही काळाची गरज लक्षात घेवून खासदार हेमंत गोडसे यांनी म्हाडा व महानगरपालिका तसेच संबंधित विभागाकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला. अखेर खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे. मनपा तसेच म्हाडाच्या विभागाने या सर्व ना हरकत परवानगी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे सातपूर येथील डाक विभागाच्या स्वमालकीच्या भूखंडावर पोस्ट ऑफिस उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच सरकारकडून इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध होणार आहे. सदर बांधकामाची वर्कआऊट ऑर्डर निघाली असून येत्या महिनाभरात प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काळात सातपूर विभागात डाक विभागाचे स्वतंत्र कार्यालय कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली. गेल्या वीस वर्षांपासून रखडलेला प्रश्न खा. गोडसे यांनी मार्गी लावल्याने सातपूरवासियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार
सातपूर येथे सुसज्ज असे पोस्ट कार्यालयची इमारत उभी राहणार आहे. या कार्यालयात नागरिकांना पोस्टाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. तसेच आधुनिक सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. या स्वतंत्र कार्यालयात साधारण पंधरा ते वीस अधिकारी, कर्मचारी यांची संख्या असणार आहे. त्यामुळे या भागातील ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.