मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्राचाळ घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. ते माजी मुख्यमंत्री म्हणजे शरद पवार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय तत्कालिन कृषी मंत्रीही जबाबदार असल्याच्या वार्तेने राज्यात खळबळ उडाली आहे.
पत्राचाळ घोटाळ्यात रोज नवीन खुलासे होत आहेत. ईडीने त्यांच्या आरोपपत्रातून आणखी दोन धक्कादायक गोष्टी समोर ठेवल्या आहेत. यामध्ये सन २००६ च्या दरम्यानच्या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती.
विशेष म्हणजे या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते, अशीही माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये खूप काही घडामोडी घडत होत्या, त्यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना माहिती होती, असे देखील सांगण्यात आले आहे. परंतु संजय राऊत यांनी ही माहिती गुप्तच ठेवली, असेही म्हटले जात आहे.
तेव्हा केवळ संजय राऊत यांनीच हे प्रकरण हाताळले नाही तर त्यामागे अनेक राजकीय दिग्गजांचा हात होता का ? असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी यात एका माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कृषिमंत्र्याचा उल्लेख होतो आहे, मग तो माजी मुख्यमंत्री कोण होता, की ज्याच्या नेतृत्वाखाली बैठक झाली, त्याचा उल्लेख मात्र ईडीने आरोपपत्रात केलेला नाही. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ईडीने आपल्या आरोपपत्रात खुलासा केला आहे की, पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रिंग केली आहे. पत्रा चाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या ६७२ भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला होता. म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील या सर्व भाडेकरूंना सदनिका देऊन तीन हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. यात गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रींग अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात संजय राऊत यांना दि. ३१ जुलै २०२२ रोजी अटक केली असून सध्या संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. आता त्यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे संजय राऊत हे प्रविण राऊतच्या माध्यमांतून पडद्याआडून मुख्य सूत्रधार म्हणून व्यवहार करत होते. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनमध्येही राऊतांचा सक्रिय सहभाग होता. दरम्यानच्या काळात राऊतांनी साक्षी पुराव्यांशी छेडछाड करून तपासयंत्रणेची दिशाभूल केली असल्याचा दावा आरोपपत्रातून केला आहे.
ईडीने खुलासा केला आहे की, संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्यामुळे प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या बहुतांश सरकारी अधिकाऱ्यांशी विविध फायदे मिळवण्यासाठी स्वतः संपर्क साधला. नंतर एफएसआय बिल्डरला विकला. याप्रकरणात राकेश वाधवान, प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचे आपसात संगनमत होते. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रवीण राऊत यांचा २५ टक्के हिस्सा होता. तरीही यात प्रवीण राऊत हे फक्त एक चेहरा होते. मात्र हे सर्व काही संजय राऊत यांच्या नियंत्रणाखाली झाले असल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
यापुर्वी राऊत कुटुंब आणि वाधवान यांच्या भोवती पत्राचाळ प्रकरण फिरत असताना आता त्याला आणखी वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणातील उल्लेख झालेले माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि माजी मुख्यमंत्री कोण आहेत? त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. विशेषतः पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रादवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
याबाबत भातखळकर यांनी एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असे सुरुवातीपासून वाटत नव्हते. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ईडीच्या आरोपपत्रात हे नाव आहे. ‘वन अॅण्ड ओन्ली वन ‘ शरद पवार आहेत. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. आता याप्रकरणी पुढे काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असे सुरुवातीपासून वाटत नव्हते. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ED च्या आरोपपत्रात हे नाव आहे.
One and only one शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी. pic.twitter.com/JwqdhPVN6E— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) September 20, 2022
Patra Chawl Scam ED Charge Sheet Ex CM Name
Sanjay Raut Sharad Pawar Atul Bhatkhalkar BJP NCP