इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक वर्षे तो मोठ्या पडद्यापासून लांब होता. आता लवकरच त्याचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो कधी चर्चेचा तर कधी वादाचा विषय ठरला. तरीही शाहरुख आशावादी होता. त्यामुळेच प्रदर्शनाच्या मार्गावर असणाऱ्या ‘पठाण’साठी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी सव्वातीन लाखांच्या आसपास ऍडव्हान्स बुकिंग त्याने मिळवले आहे. तर दुसरीकडे विविध कारणांमुळे बंद झालेली देशभरातील २५ सिनेमागृहांचे दरवाजे ‘पठाण’मुळे प्रेक्षकांसाठी उघडले जाणार आहेत.
कोरोनाचा काळ हा चित्रपटगृहांसाठी कर्दनकाळ ठरला होता. कोरोनानंतर अद्यापही देशभरातील बरीच चित्रपटगृहे विविध कारणांमुळे सुरूच झालेली नाहीत. यापैकी २५ चित्रपटगृहांच्या दरवाजावरील कुलुपे ‘पठाण’च्या आगमनासोबत काढली जाणार आहेत. हिंदीसह तमिळ आणि तेलुगूमध्येही रिलीज होणाऱ्या ‘पठाण’चा मुहूर्त साधत देशातील विविध राज्यांमधील २५ सिनेमागृहे पुन्हा खुली केली जाणार आहेत. सिनेप्रेमींसाठी ही खूशखबर आहे.
चार वर्षांनी शाहरुख रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार असल्याने प्रॉडक्शन हाऊसपासून वितरकांपर्यंत सर्वांनीच आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. एकाच मुहूर्तावर देशातील २५ सिनेमागृहे पुन्हा सुरू करण्यासाठी शाहरुखच्या टीममधील प्रत्येक घटकाने खूप मेहनत घेतली आहे. सिनेमागृहांच्या मालकांचीही त्यांना साथ लाभल्याने हे शक्य झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पुन्हा नव्याने रसिकांच्या सेवेत दाखल होणाऱ्या चित्रपटगृहांमध्ये महाराष्ट्रमधील २, छत्तीसगडमधील २, गोवा १, मध्य प्रदेश १, उत्तराखंडमधील १, उत्तर प्रदेशमधील ११, राजस्थानमधील ७ अशा एकूण २५ चित्रपटगृहांचा समावेश आहे.
Pathaan Movie 25 Theaters Will Restart Again