नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सहकार संस्थांमध्ये महत्त्वाचा घटक म्हणून पतसंस्थांकडे पाहिले जाते. गोंदिया जिल्ह्यात संत नरहरी पतसंस्थेत ५८ लाखाचा घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. याआधी पाच जणांना अटक करण्यात आली होती. आता अटक करण्यात आलेल्या आरोपीची संख्या सात झाली असून, नितेश बिसेन (४४ रा. गोंदिया) आणि पंकज वंजारी (४३ रा. गोंदिया) असे नुकतेच अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात २००९ साली संत नरहरी पतसंस्था सुरू करण्यात आली होती. या संस्थेमध्ये अनेक नागरिकांनी आपली खाती उघडली आणि पैसे जमा केले. मात्र पतसंस्थेत अनेक अनियमिततेचे कारण व विड्रॉल देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने, या पतसंस्थेमध्ये असलेल्या एजंट व खातेदारांनी पतसंस्थेच्या संचालकांची तक्रार सहाय्यक निबंधकाकडे दिली. सहाय्यक निबंधकाकडून फेर लेखापरीक्षण २०१५ ते २०१९ पर्यंतचे करण्यात आले. यात एकूण ५८ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप समोर येताच विविध कलमांतर्गत रामनगर पोलिस स्टेशनला एकूण १४ लोकांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली.
या प्रकरणात रामनगर पोलिसांनी सुरुवातीला पाच लोकांना अटक केली. त्यानंतर १९ जुलै रोजी दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. पतसंस्थेतील एजंट आणि खातेदारांनी संस्थेतील अनियमिततेबाबत सहाय्यक निबंधकांकडे तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी चौकशी झाली आणि बँकेतील हा घोटाळा उघडकीस आला.
Patasanstha Fraud Again 2 arrested Crime Cheating Gondia Sant Narhari Patsanstha