नाशिक – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे येथील स्व.पत्रकार अशोक शिंदे यांच्या कुटुंबियांना ८० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले. उपरोक्त रकमेचा धनादेश जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक तथा अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत पवार यांचे हस्ते श्रीमती मंदा अशोक शिंदे व मुलगा योगेश शिंदे यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ [रजि.]नाशिकचे सभासद व इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे येथील ज्येष्ठ पत्रकार स्व. अशोक शिंदे यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. प्रदीर्घ उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाने सन २०१० पासून सभासद पत्रकारांसाठी अपघाती विमा सुरक्षाकवच योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत स्व.अशोक शिंदे यांच्या कुटुंबियांना रु.८० हजाराचा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे,खजिनदार विजय बोराडे,जिल्हा पदाधिकारी शरद मालुंजकर,पत्रकार किसन काजळे,ज्ञानेश्वर गुळवे आदींसह स्व.अशोक शिंदे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.