विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
योगगुरू रामदेव यांनी अॅलोपॅथीवरुन देशभरातील डॉक्टरांशी पंगा घेतला असतानाच एक बाब समोर आली आहे. पतंजली आयुर्वेदच्या डेअरी व्यवसायाचे प्रमुख सुनील बन्सल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांचा मृत्यू १९ मे रोजी झाला होता. बन्सल यांच्या अॅलोपॅथिक उपचारांमध्ये पतंजली कंपनीची कोणतीच भूमिका नव्हती, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
डेअरी विज्ञानामधील तज्ज्ञ म्हणून परिचित असलेल्या बन्सल यांनी जानेवारी २०१८ मध्ये पतंजली डेअरीची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी पतंजलीने डबाबंद दूध, दही, ताक, चीजसह इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन विक्री करण्याची योजनेची घोषणा केली होती. जयपूरच्या राजस्थान रुग्णालयात १९ मे रोजी त्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला. त्यांची पत्नी राजस्थान सरकारमध्ये वरिष्ठ आरोग्य अधिकारी आहे.
अॅलोपॅथी औषधांवर बाब रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यादरम्यानच बंसल यांचा मृत्यू झाला आहे. पतंजलीच्या निवेदनातही याची झलक दिसली आहे. अॅलोपॅथिक उपचारात पतंजलीची कोणतीच भूमिका नव्हती. त्यांच्या उपचाराबाबतचा समन्वय त्यांच्या पत्नीनेच साधला होता. आम्ही त्यांच्या तब्येतीची पत्नीकडून माहिती घेत होतो, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. पतंजलीकडून कोरोनील हे कोरोनावरील औषध बाजारात आणण्यात आले आहे. या औषधामुळे कोरोना नष्ट होतो, असा कंपनीचा दावा आहे. असे असतानाच कंपनीच्या एका विभाग प्रमुखाने हे औषध न घेता अॅलोपॅथीचे उपचार कसे घेतले, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.