इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केवळ भारतातच नव्हे तर जगभरात योगगुरू म्हणून ओळखल्या जाणारे बाबा रामदेव हे अनेक कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. काही वेळा वादग्रस्त वक्तव्यामुळे तर काही वेळा आपल्या कंपनीच्या प्रचारामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडतात, सध्या देखील असेच घडले आहे. बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली समूहाच्या आयुर्वेदिक औषध कंपनी दिव्या फार्मसीने काही हृदय आणि यकृत दाव्यांची जाहिरात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. औषध कायद्याचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, केरळमधील एका नेत्ररोग तज्ज्ञाने केंद्रीय आयुष मंत्रालयाला कंपनीकडून केल्या जाणाऱ्या प्रमोशनबाबत एक पत्र लिहिले होते, त्यामध्ये त्यांनी डेहराडूनमधील दिव्या फार्मसीद्वारे जाहिरात चालवली जात असल्याचे सांगितले होते. लिपिडॉम हे औषध घेतल्यावर आठवडाभरात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते आणि हृदयाच्या समस्या आणि उच्च रक्तदाबापासून लोकांचे संरक्षण होते, असा दावा करण्यात आला आहे.
या पत्रात पुढे लिहिले की, कंपनीची ही जाहिरात ड्रग अँड मॅजिक रेमेडीज अॅक्टचे उल्लंघन करणारी आहे, ज्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की कोणतीही कंपनी हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यासह आरोग्य समस्यांवरील उपचारांशी संबंधित जाहिराती चालवू शकत नाही. दिव्या फार्मसीच्या जाहिरातीविरोधात तक्रार मिळाल्यानंतर केंद्रीय आयुष मंत्रालयाने उत्तराखंड प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. या तक्रारीच्या आधारे उत्तराखंड सरकारने कंपनीला नोटीस पाठवली आहे.
माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने उत्तराखंड आयुर्वेदिक आणि युनानी विभागाकडून मिळालेल्या नोटीसला उत्तर दिले की, ती आपली जाहिरात त्वरित प्रभावाने थांबवत आहे. त्याचवेळी सदर डॉक्टर म्हणाले की, भूल करणाऱ्या जाहिराती पाहून लोक काही उत्पादने विकत घेतील आणि त्यांना कदाचित ही जाहिरात दिशाभूल करणारी होती हे माहीतही नसेल.
आयुष मंत्रालयाने या वर्षाच्या सुरुवातीला संसदेत सांगितले की दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात तक्रारी नोंदवण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने तयार केलेल्या पोर्टलवर एप्रिल 2014 ते जुलै 2021 दरम्यान दिशाभूल करणारी आयुष उत्पादने आणि सेवांची 1,416 प्रकरणे नोंदवण्यात आली.