विशेष प्रतिनिधी,
नवी दिल्ली : महाराष्ट्रात मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे. परंतु उत्तर भारतात विशेषतः नवी दिल्लीमध्ये पावसाळी हवामानात आषाढ- श्रावण महिन्यात देखील पतंगबाजी सुरू असते. या पतंगाबाजीचा फटका संसदेच्या सुरक्षा व्यवस्थादेखील बसला. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून एक पतंग चक्क संसद भवनात उडून आल्याने एकच खळबळ उडाली. वास्तविक संसदेमध्ये खासदार आपल्या भाषणात पतंगबाजी करत असतात. परंतु दिल्लीमधील एका पतंगबाजाने चक्क पतंग उडवित असताना संसदेवर पतंग पाडल्याचा पराक्रम केला. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी या गंभीर घटनेने संसद भवन संकुलात एकच खळबळ उडाली. तासाभराच्या सखोल तपासानंतर एनएसजीने सुटकेचा श्वास घेतला.
सध्या शेतकरी आंदोलनामुळे संसद भवनाची सुरक्षा पूर्वीपेक्षा खूपच जास्त कडक केली आहे. दिल्लीत श्रावन महिन्यात पतंग उडवणे ही नवीन गोष्ट नाही. मात्र, या पतंगबाजीने सोमवारी संसद भवन संकुलात खळबळ उडाली. त्यानंतर एनएसजीने संसदेच्या इमारतीचा एक भाग ताब्यात घेतला आणि स्निफर कुत्र्यांनाही आत बोलावण्यात आले. मात्र, एक तासाच्या कसून चौकशीनंतर, कळले की या कापलेल्या पतंगामुळे ( कटी पतंग ) सुरक्षेला कोणताही धोका नाही, तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि: श्वास सोडला.
दरम्यान अशी माहिती कळाली की, दुपारच्या सुमारास, एक पतंग कापला गेला आणि संसद भवन परिसरातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ पडला. अलीकडे ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. पतंग कापल्यानंतर आणि पडल्यानंतर संसदेच्या इमारतीच्या सुरक्षेशी संबंधित सर्व एजन्सी अलर्ट मोडवर होत्या. सध्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था पूर्वीपेक्षा खूपच वाढवण्यात आली असून संसद भवनाच्या बाहेर दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांचा मेळावा आहे. संसदेच्या आत वॉच आणि वॉर्डसोबतच एनएसजीला सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे.