इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात प्रत्येक व्यक्तीला राज्यघटनेनुसार धार्मिक स्वातंत्र्य आहे, असे म्हटले जाते. परंतु दुसऱ्याच्या धार्मिक तत्त्वावर आणि आचार -विचारांवर कोणीही अतिक्रमण करू नये, अन्यथा शिक्षा होऊ शकते. मात्र गेल्या काही वर्षात सक्तीने धर्मांतर करण्याच्या कारवाया वाढल्या आहेत, असे दिसून येते. विशेषतः पश्चिम बंगाल, केरळ आणि गोवा सारख्या राज्यांमध्ये ख्रिश्चन धर्मगुरू सक्तीने धर्मांतर असल्याचा आरोप करण्यात येतो, गोव्यात अशा प्रकारे सक्तीने धर्मांतर करण्याचा गैरप्रकार घडला असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखविल्या प्रकरणी गोवा पोलिसांनी धर्मगुरू आणि त्याच्या पत्नीला अटक केली. त्यांच्यावर असा आरोप आहे की, धर्मगुरू आणि त्याची पत्नी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याच्या बदल्यात नागरिकांना पैशाचे आमिष दाखवत असत, तसेच जर ते येशूच्या आश्रयाला गेले तर त्यांचे सर्व त्रास संपतील, असे त्यांना सांगत होते.
धर्मांतराच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे पुजारी आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या. पुजारी आणि त्यांच्या पत्नीला कोर्टातून जामीन मिळाला असला तरी पोलिसांनी धर्मांतरासाठी वापरलेल्या जागा सील केल्या आहेत. या प्रकरणाबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, धर्मांतराच्या अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्याला जामीन मंजूर झाला पण त्याचे घर आणि या कामांसाठी वापरलेली ठिकाणे सील करण्यात आली आहेत. अशा कारवाया आम्ही खपवून घेणार नाही.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाद्री डॉमिनिक डिसोझा आणि त्यांची पत्नी जोन हे काही जणांना पैशांशिवाय आमिष दाखवत होते की, जर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्यांचा जुना आजार बरा होईल. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या साळीगाव गावात धर्मगुरु आणि त्याची पत्नी धर्मांतराचे रॅकेट चालवत होते. दोघांवर धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. तसेच हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्यांशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.