नाशिक – पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्त जाणाऱ्या भाविकांना महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रिकानुसार ७ जुलै ते १५ जुलै या कालावधीमध्ये पंढरपूर येथे जाताना व येताना भाविक व वारकऱ्यांच्या जड आणि हलक्या वाहनांसाठी पथकरांतून सवलत देण्यात आलेली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी पासेस पोलिस स्थानकात वितरित केले जात असल्याची माहिती नाशिकचे जनसंपर्क अधिकारी तथा पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १ अमोल तांबे यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी हलक्या व जड वाहनांनी जाणाऱ्या भाविकांनी त्यांच्या वाहनांसाठी पासेस उपलब्ध करून घ्यावेत. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील १३ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सदरचे पास वितरित केले जात आहेत. तरी संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे भावीक आणि वारकऱ्यांनी ते राहत असणाऱ्या पोलीस स्टेशन येथे जाऊन त्यांच्या वाहनांसाठी पास उपलब्ध करून घ्यावेत.