इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्ली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश वर्मा यांनी त्यांचा १८४४ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. त्यामुळे परवेश वर्मा हे जायंट किलर म्हणून त्यांच्याकडे आता बघितलं जात आहे.
या विजयानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले. परवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत. ४८ वर्षीय वर्मा हे पश्चिम दिल्लीचे माजी खासदार आहेत. ते २०१४ व २०१९ मध्ये दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये त्यांना ५ लाख ७८ हजार ४८६ अशी सर्वाधिक मते मिळाली होती. परवेश वर्मा यांची पत्नी स्वाती सिंग या माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशातील भाजप नेते विक्रम वर्मा यांची मुलगी आहे.
वर्मा हे जाट समुदायातून येतात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून दिल्ली आणि हरियाणा जाट मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते.