ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविद्यालयीन विश्वात मानाची असलेली कै. नी. गो. पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यंदा ०१ आणि ०२ ऑक्टोबर रोजी ठाण्यात होणार आहे. श्री समर्थ सेवक मंडळ, ठाणे यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेचे यंदाचे ५४वे वर्ष आहे. ही स्पर्धा कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालये अशा दोन गटात आयोजित केली जाते. प्रत्येक गटात पाच स्पर्धक पाठविण्याची महाविद्यालयांना संधी आहे.
पदवी गटासाठी नियोजित भाषणाकरता १. शेजारी राष्ट्रांमधील सत्ता संघर्ष आणि भारत, २. मराठी साहित्यातील वसंत बापट यांची मुशाफिरी, ३. स्टार्ट अप – माझ्या नजरेतून मूल्यमापन, ४. अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा – बदलत्या जाणिवांचा, ५. तरुणाई आणि मानसिक स्वास्थ्य असे विषय देण्यात आले आहेत. तर, कनिष्ठ गटासाठी, १. शाळेपासून भेटलेल्या शांताबाई शेळके, २. युद्धाच्या ज्वाला, महागाईची झळ, ३. माझ्या नजरेतून अग्निपथ योजना, ४. सप्तसुरांतील सुर हरपला, ५. चित्रपट क्षेत्रावर वेब सिरिजचे बूमरांग हे विषय आहेत.
स्पर्धकांना नियोजित भाषणासाठी प्रत्येकी १० मिनिटे, तर आयत्यावेळेच्या विषयासाठी तीन मिनिटांचा वेळ दिला जाईल. स्पर्धकांनी नियोजित आणि उत्स्फूर्त दोन्ही भाषणे करणे अपेक्षित आहे. विजेत्यांना प्रत्येक गटात प्रथम क्रमांकास ६००० रुपये, द्वितीय क्रमांकास ३००० रुपये, तृतीय क्रमांकास २००० रुपये आणि उत्तेजनार्थ १००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ ०२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता शिव दौलत सभागृह, हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतनसमोर, ठाणे येथे होईल, अशी माहिती स्पर्धा समितीचे चिटणीस डॉ. चैतन्य साठे यांनी दिली आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती, नावनोंदणी, बाहेर गावच्या स्पर्धकांसाठी विनामूल्य निवास व्यवस्था आदी तपशिलासाठी स्पर्धा समितीशी ९९८७९०६२०६ किंवा ९८२१५७२४२७ येथे संपर्क साधावा असे आवाहन समितीचे आणि मंडळाचे अध्यक्ष संजीव हजारे यांनी केले आहे.
Participate and Win 12 Thousand Prizes in This Competition