इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी आज त्यांच्या आभासी सुनावणीदरम्यान अक्षरशः ढसाढसा रडले. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यानंतर हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ऑनलाइन सुनावणीदरम्यान पार्थ चॅटर्जीने न्यायाधीशांना सांगितले की, “मला सार्वजनिकरित्या माझ्या प्रतिमेबद्दल खूप काळजी वाटते. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी होतो. मंत्री होण्यापूर्वी मी विरोधी पक्षनेता होतो.
आवाहन करताना ते म्हणाले की, “मी राजकारणाचा बळी आहे. कृपया ईडीला एकदा माझ्या घराला आणि माझ्या विधानसभा मतदारसंघाला भेट देण्यास सांगा. मी एलएलबी आहे आणि मला ब्रिटिश शिष्यवृत्ती मिळाली आहे. माझी मुलगी यूकेमध्ये राहते. अशा घोटाळ्यात मी स्वतःला कसे गुंतवू शकतो? न्यायापूर्वी मला वैद्यकीय उपचार दिले पाहिजेत.” पार्थ चॅटर्जी यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयात दाद मागताना त्यांच्या वकिलाने सांगितले की, “माझे क्लायंट तपास यंत्रणेला सहकार्य करत आहे. भविष्यातही ते सहकार्य करण्यास तयार आहेत. कृपया त्यांना कोणत्याही परिस्थितीत जामीन द्या.” तर, चटर्जी म्हणाले की, “मला शांततेत जगायचे आहे. कृपया मला माझे जीवन जगण्याची परवानगी द्या. मला कोणत्याही परिस्थितीत जामीन द्या,” असे चटर्जी यांनी न्यायालयाला सांगितले.
वृत्तानुसार, चॅटर्जींची सहकारी अर्पिताला काही वेळातच न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. अर्पिता मुखर्जी यांनी न्यायालयाला सांगितले की, “माझ्यासोबत हे कसे घडले हे मला माहीत नाही. अंमलबजावणी संचालनालयाने माझ्या घरातून एवढी मोठी रक्कम कशी आणि कोठून जप्त केली आहे, हे मला माहीत नाही.” त्यानंतर न्यायाधीशांनी अर्पिताला विचारले की तिला पैसे कोठून आणायचे हे माहित आहे का? त्यावर अर्पिताने उत्तर दिले, “माझ्या निवासस्थानावरून.” न्यायाधीशांनी पुढे विचारले, “तुम्ही घराचे मालक आहात का?” यावर अर्पिताने होकारार्थी उत्तर दिले आणि ती म्हणाली. ती घराची मालक आहे.
न्यायाधीश पुढे म्हणाले, “मग कायद्यानुसार तुम्ही जबाबदार आहात.” यावर अर्पिता म्हणाली, “पण जप्त झालेल्या पैशांबद्दल मला काहीच माहिती नाही. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. माझे वडील राहिले नाहीत. माझ्या ८२ वर्षांच्या आईची तब्येत बरी नाही. मी एका साध्या कुटुंबातील आहे. ईडी माझ्या घरावर छापा कसा घालू शकेल?” त्यानंतर न्यायाधीश म्हणाले, “ईडी त्यांच्या तपासात गरज पडल्यास कोणत्याही घरावर छापा टाकू शकते. त्यांच्याकडे शक्ती आहे.”
जुलैमध्ये ईडीने अर्पिता मुखर्जीच्या कोलकाता येथील निवासस्थानातून मोठी रोकड जप्त केली होती. आर्थिक तपास संस्थेने अर्पिताच्या घरातून सुमारे ५० कोटींची रोकड, सोने आणि दागिने जप्त केले होते. एजन्सीला दोषी कागदपत्रे देखील सापडली जी बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.
Partha Chaterjee and Arpita Mukherjee Court Hearing