पारनेर (अहमदनगर) – येथील तहसिलदार ज्योती देवरे आणि आमदार निलेश लंके यांच्यामध्ये जोरदार जुंपल्याचे दिसून येत आहे. मानसिकदृष्ट्या छळ होत असल्यामुळे तहसिलदार देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे थेट आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्यामुळे ही बाब संपूर्ण राज्यात चर्चेची ठरत आहे. सध्या ही क्लिप सोशल मिडियात व्हायरल झाली आहे. देवरे यांनी थेट लंके यांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख लंके यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे. तसेच, जो पारदर्शक कारभार करतो त्याला घाबरण्याचे कारण नाही. देवरे यांचे कामकाज कसे आहे हे सर्वांना माहित आहे. त्यांच्या चौकशीची प्रकरणे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात सादर झाल्या आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यापासून बचावासाठी त्यांना हा प्रयत्न केल्याचे लंके यांनी म्हटले आहे.
विदर्भातील वनाधिकारी दिपाली चव्हाण यांचे आत्महत्याप्रकरण गाजले आहे. याच दिपाली चव्हाण यांना संबोधून देवरे यांनी ऑडिओ क्लिप केली आहे. मी महिला अधिकारी असल्याने मला लक्ष्य केले जाते. लवकरच तुझ्या वाटेवर मी तुला सोबत करण्यासाठी येत असल्याचे देवरे यांनी क्लिपमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आमदार आणि तहसिलदार या संघर्षामुळे लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा संघर्षही तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पुढे काय होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.