इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – येत्या काळात राज्यसभेतून अनेक नेते आपल्या पदांवरुन कार्यकाळ संपल्याने निवृत्त होतील यामध्ये अनेक बड्या राजकारणी नेत्यांचा समावेश आहे. सुब्रमण्यम स्वामी राज्यसभेतून निवृत्त होणार असून, स्वामी यांचा कार्यकाळ २४ एप्रिल रोजी संपणार आहे. काँग्रेसचे जी २३ नेते आनंद शर्मा, कपिल सिब्बल, एके अँटनी आणि अंबिका सोनी, प्रताप सिंग बाजवा हेही वरिष्ठ सभागृहातून निवृत्त होणार आहेत. राजस्थान भाजपमधील ओमप्रकाश माथूर, राम कुमार वर्मा, हर्षवर्धन सिंग आणि अल्फोन्स यांचा कार्यकाळ ४ जुलै रोजी संपणार आहे. झारखंडमधील मुख्तार अब्बास नक्वी आणि महेश पोद्दार यांचा दोन जागांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत आहे.
सुरेश प्रभू, वायएस चौधरी, टीजी व्यंकटेश यांचा म्हणजे आंध्र प्रदेशातील भाजपच्या चार राज्यसभेच्या जागांचा कार्यकाळ २१ जून रोजी संपणार आहे. महाराष्ट्र भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे पी चिदंबरम आणि शिवसेनेचे संजय राऊत यांचा कार्यकाळ संपणार आहे. छत्तीसगडमधून भाजपचे रामविचार नेताम आणि काँग्रेसच्या छाया वर्माही पदावरुन निवृत्त होणार आहेत. मध्य प्रदेशातील तीन जागांची मुदत २९ जून रोजी संपणार आहे. यामध्ये भाजपचे एमजे अकबर, संपतिया उईके आणि काँग्रेसचे विवेक तनखा यांचा समावेश आहे. दुष्यंत कुमार आणि हरियाणा भाजपचे अपक्ष सुभाष चंद्रा यांचा कार्यकाळ १ ऑगस्ट रोजी संपणार आहे. बिहारमधील पाच जागांची मुदत ७ जुलै रोजी संपणार आहे. आसाममधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार रिपुन बोरा आणि राणी नारा यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. त्रिपुरातील सीपीआय खासदार झरना दास यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे.
पक्षीय बलाबलही येत्या काळात बदलणार आहे. सध्या पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकांचे निकाल हे राज्यसभेच्या १९ जागा निश्चित करणार आहेत. या १९ मध्ये सध्या भाजपकडे ६, काँग्रेस ५, सपा ३, शिरोमणी अकाली दल ३, बसपा २ जागा आहेत. सद्यस्थितीत राज्यसभेमध्ये भाजप आणि त्याच्या घटक पक्षांकडे एकूण ११४ जागा आहेत. त्यात भाजपकडे ९७, जदयूकडे ५, अण्णाद्रमुककडे ५, अपक्ष १, छोटे पक्ष ६ यांचा समावेश आहे. एप्रिल आणि ऑगस्ट या काळात राज्यसभेच्या एकूण ७० जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपला ५ आणि अण्णाद्रमुकला १ जागेचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच भाजप व घटकपक्षांचे संख्याबळ ११४ वरुन १०७ वर येण्याची चिन्हे आहेत.