नवी दिल्ली – गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांसह त्यांच्या पालकांना शिक्षा करण्याची तरतूद असलेला कायदा चीनच्या संसदेत लवकरच मंजूर होणार आहे. कुटुंब शिक्षण संवर्धन कायद्याच्या मसुद्यानुसार खूप वाईट वागणूक करणार्या किंवा गुन्हा करणार्या मुलांच्या पालकांनाही या कायद्याअंतर्गत सार्वजनिक रूपात फटकारले जाणार आहे. अशा पालकांना कुटुंब शिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाठविले जाणार आहे. या कार्यक्रमात त्यांना मुलांच्या संगोपनाच्या पद्धती समजावून सांगितल्या जाणार आहेत. तसेच बिघडलेल्या मुलांना कशा प्रकारे सुधारावे हेही सांगितले जाणार आहे.
कुटुंबात व्यावहारिक शिक्षण
नॅशनल पिपुल्स काँग्रेसचे विधायक प्रकरणांच्या आयोगाचे प्रवक्ते जेंग ताइवे सांगतात, अल्पवयीन मुलाकडून गुन्हेगारी कृत्य होण्यामागे अनेक कारणे असतात. कुटुंबातून त्यांना व्यावहारिक शिक्षण दिले जात नाही, हे सर्वात मोठे कारण आहे. संसदेची स्थायी समिती या आठवड्यात विधेयकाचा आढावा घेणार आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर विधेयकाचा प्रारूप आराखडा संसदेसमोर चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे. यामध्ये मुलांचा आराम, खेळण्याचा आणि व्यायामाचा वेळ कसा सुनिश्चित करावा हे आई-वडिलांना सांगितले जाणार आहे.
व्यसनांपासून दूर
मुलांनी वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी चीन सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. ऑनलाइन गेमचे व्यसन कमी करण्यावरही भर दिला जात आहे. ऑनलाइन गेमचे अमली पदार्थांसारखे वाईट व्यसन असते असेही सांगण्यात आले आहे. शिक्षण मंत्रालयाने इंटरनेट गेमिंगचे तास मर्यादित केले आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रत्येकी एक तास मुलांना इंटरनेटवर गेम खेण्याची परवानगी देण्यात आली आहे. इंटरनेटवरील सेलिब्रिटीजची देवासारखी पूजा करणे आणि त्यांचा मुलांवरील होणारा परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही केले जात आहेत.
ट्यूशनवर बंदी, गृहपाठात कपात
शिक्षण मंत्रालयाने मुलांना शाळेतून मिळणार्या गृहपाठात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळेनंतर ट्यूशनवरही बंदी घालण्यात आली आहे. आठवडाअखेर आणि सुट्टीच्या दिवशीच प्रमुख विषयांची ट्यूशन घेण्याची परवानगी आहे. अभ्यासाचे ओझे कमी करून मुलांना हसत-खेळत ठेवण्यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत. मुलांना मानसिकरित्या बळकट बनविण्यावर तसेच बहुविध विकासावर भर देण्यात आला आहे.