परभणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्याकडे आजही थोरल्या भावाला वडील भाऊ म्हणण्याची पद्धत आहे. आणि थोरला भाऊ देखील या नात्याला जागत धाकट्या भावंडांची संपूर्ण जबाबदारी घेतो. आई – वडिलांच्या माघारी हा थोरला भाऊच संपूर्ण जबाबदारी घेतो. याचेच एक उत्तम उदाहरण नुकतेच समोर आले आहे.
परभणीतील माखणी (ता. गंगाखेड) गावातील या तिन्ही भावंडांची नुकतीच पोलीस भरतीत अंतिम निवड झाली. या प्रवासात या तीनही भावंडांना त्यांच्या थोरल्या भावाचा चांगलाच आधार मिळाला. शेतीच्या त्रासातून या तिन्ही भावंडांच्या आई-वडिलांनी आत्महत्या केली. यानंतर सिसोदे कुटुंबातील मोठा मुलगा अर्थात आकाश सिसोदे यांनी आपल्या भावंडाना बळ दिले.
आश्रमशाळेत शिक्षण
लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर या मुलांनी आश्रमशाळेतून शिक्षणाची वाट निवडत तिन्ही भावंडांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत चांगलेच यश पटकावले. या तिन्ही भावंडांची नुकतीच पोलीस भरतीत अंतिम निवड झाली आहे. या संघर्षमयी प्रवासात या तिन्ही भावंडांना थोरला भाऊ आकाश यांचे पाठबळ मिळाले.
परभणीत सहारा
दहा वर्षे पूर्ण होण्याआधीच कृष्णा, ओंकार, आकार आणि आकाश या सिसोदे बंधूंच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले. दुसरीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत त्यांनी खानापूर फाटा येथील आश्रमशाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर या तिघांना परभणीतील जिजाऊ ज्ञानतीर्थ या शैक्षणिक संस्थेत मोफत सहारा मिळाला.
वसतीगृहात काम
तिथे त्यांनी आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील महिला आणि बालविकास विभागाच्या वसतिगृहात काम केले पण शिक्षणाची कास काही सोडली नाही. दरम्यान पोलीस भरतीची जाहिरात आली. तिन्ही भावंडांपैकी कृष्णा आणि आकार यांनी मुंबई, तर ओंकार याने परभणीत अर्ज भरला. आणि या तिघांच्याही परिश्रमाचे फलित म्हणून पहिल्याच फटक्यात या तिघांचीही निवड झाली.
मोठा भाऊ आजही सालगडीच
या तीनही भावंडांना त्यांच्या मोठ्या भावाने आकाशने अगदी निगुतीने सांभाळले. कृष्णा, ओंकार आणि आकार ही तीनही मुले लहान असतानाच आई-वडिलांनी नापिक शेतीमुळे आत्महत्या केली. त्यामुळे मोठा भाऊ आकाशवर कुटुंबाची जबाबदारी आली. मिळेल ते काम करत त्याने भावंडांना शिक्षणासाठी प्रोत्साहन तर दिलेच पण मदतही केली. वेळप्रसंगी भावंडांचा आई – वडील होऊन सांभाळ केला. असा हा आकाश आजही माखणी गावात सालगडी म्हणून काम करत आहे.
Parbhani Sisode Family Police Recruitment Success Story