परभणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शेतक-यांचा आसूड, गुलामगिरी वाचल्यानंतरच त्यांनी केलेल्या कामाची महती कळेल,असे सांगून सर्वांनी महात्मा फुले यांची पुस्तके आवर्जून वाचावी आणि त्यांचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवावे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज परभणी जिल्हा परिषदेसमोरील चौकातील आद्य शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे, पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. राहुल पाटील, आ.रत्नाकर गुट्टे, आ.राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होेते.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी यापूर्वीच परभणीला येऊन गेल्याचे सांगत, मंडल आयोगातील शिफारशींबाबत माहिती दिली. स्त्री -पुरुष समानता आणण्याचे फुले दाम्पत्याचे स्वप्न आज साकार होत आहे. पुरुषांच्या बरोबरीने स्रियांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे आता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. आज मुलींना मुलांच्या बरोबरीने उच्च शिक्षण देण्याबाबत आमदार भुजबळ यांनी उपस्थितांना आवाहन केले.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत महोज्योतीच्या माध्यमातून ७३ हजार मुलींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मंत्री म्हणून आम्ही राज्य शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबवित असल्याचे सांगत नागपूरसह प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी वसतिगृह बांधत आहोत. मुलींना मोफत शिक्षण, १०० विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, बसचा मोफत प्रवास अशा विविध योजनांची माहिती मंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिली.
तसेच १ जानेवारी १८१८ रोजी फुले दाम्पत्याने भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. लवकरच येथे फुले दाम्पत्यांचे स्मारक उभारण्यात येणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कामाचे भूमीपूजनही करण्यात आल्याचे मंत्री सावे म्हणाले.
साता-यातील नायगावात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने २०० मुलींना राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये नियुक्तीसाठी प्रशिक्षण देणार आहोत, असे सांगून त्याबाबतच्या कामासाठी नुकताच १० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यात आतापर्यंत ७२ पैकी ५४ वसतिगृह सुरू केले असून, प्रवेश न मिळालेल्यांसाठी महाज्योतीच्या माध्यमातून मुलींना शिष्यवृत्ती सुरू केली असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना जिल्ह्यातील एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करूयात. एक उच्चशिक्षित, संस्कारीत समाज म्हणून आपण सर्वजण एकत्रित काम करूयात, असे आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी उपस्थितांना केले.
पुढे बोलताना आजचा क्षण हा आनंददायी असल्याचे सांगताना पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सावित्रीबाईंच्या पुर्णाकृती पुतळा लोकार्पण कार्यक्रमाला महिलांच्या लक्षणीय उपस्थितीकडे मान्यवरांचे लक्ष वेधले. पुढे त्या म्हणाल्या की, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी समाजातील मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. आताही महायुतीचे हे शासन मुलींना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहे. यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य शासनातील महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
माजी महापौर प्रताप देशमुख यांनी पुतळा उभारण्यामागील पार्श्वभूमी थोडक्यात विशद केली.रोहित राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे शिल्पकार धनंजय वडगीरकर यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने स्वागत केले.