परभणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात महापालिकेच्या शिक्षण विभागाचे भ्रष्टाचार प्रकरण चांगले गाजले महापालिकेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी धनगर यांच्याकडे धाड टाकली असता अमाप संपत्ती आढळून आली. त्याचप्रमाणे शिक्षण विभागातील अन्य काही अधिकाऱ्यांनी देखील असेच गैरकारभार केल्याने भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार उघडकीस आले. नाशिक शहरात नव्हे तर राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील असेच गैरप्रकार शिक्षण विभागात सुरू असल्याचे दिसून येते. परभणी जिल्ह्यात असाच प्रकार आढळून आला. एका मुख्याध्यापकाने चक्क इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी लाच मागितल्याने त्याला रंगेहात अटक करण्यात आली असून या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
यांनी केली लाचेची मागणी
परभणी जिल्ह्यातील शिक्षण विभागच्या भ्रष्ट कार्यपद्धतीची सर्वत्र चर्चा होत असताना आता जिल्ह्यातील शासनमान्य शाळांमध्ये प्रवेशासाठी भरमसाठ डोनेशन घेऊन पालकांची पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच शहरातील बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळा, नानलपेठ येथे पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी ७५०० रुपयांची लाचेची मागणी करून ४ हजार रुपये लाच स्वीकारताना येथील शाळेचा कनिष्ठ लिपिक मोहमद अब्दुल रफी मोहमद अब्दुल रशीद (वय ५४) तसेच मुख्याध्यापक एकनाथ कच्छवे (वय ५७ ) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा रचून अटक केली आहे. यातील एका तक्रारदार पालकाच्या मुलीचे पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी यातील दोन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी लाचेची मागणी केली म्हणून तक्रार प्राप्त झाली होती. तसेच याची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली होती.
असा लावला सापळा
बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक व लिपिक यांनी एका तक्रारदार पालकाला त्यांच्या मुलीच्या पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी तडजोडीअंती ५५००रुपये पंचासमक्ष लाचमागणी केली. त्यापैकी ४ हजार रुपये ३ जुलैला मुख्याध्यापकांनी शाळेचे कनिष्ठ लिपिक यांच्याकडे देण्यास सांगितले. उर्वरित १५०० रुपये दीड ते दोन महिन्यांनंतर आणून देण्यास सांगितले. जुलैला करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान तक्रारदार यांचे कडून ४ हजार लाचेची रक्कम पंचासमक्ष लिपिकाने स्विकारली. लाचेच्या रकमेसह कनिष्ठ लिपिक यांना लागलीच ताब्यात घेण्यात आले. बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यालाही एसीबी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नानलपेठ पाेलिस ठाणे येथे करण्यात आली. या प्रकरणी डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी अशोक इप्पर, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, परभणी यांच्या सहकारी पथकाने ही कारवाई केली .