कृषि प्रेरणा दालन वाढवतेय शेतकऱ्यांची उत्सुकता
नाशिक : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल अशा कापूस ते कापड , केळी प्रक्रीया उद्योग, पापड पोहचले अमेरिकेला, सौर वाळवण प्रक्रिया अशा अनेक यशोगाथा, तसेच सेंद्रिय शेती, बांबू शेती, महाडीबीटी अभियान यासारख्या माहितीचे फलक असलेले प्रदर्शन म्हणजेच कृषि प्रेरणा दालन शेतकऱ्यांच्या उत्सुकतेचे दालन बनले आहे.
राज्य कृषि विभागातर्फे कृषि क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कृषि पुरस्कार प्रदान कार्यक्रमानिमित्त कृषि प्रेरणा दालन दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठात रविवारी (दि.1) तयार करण्यात आले आहे. दोन दिवस हे प्रदर्शन पाहता येईल. यात शेतीविषयक योजना ते त्यावर प्रक्रिया व त्यांची विक्री यांच्याविषयी नेमकेपणाने माहिती दिली आहे.
सीड मदर रहिबाई पोपरे यांच्या कार्याविषयीच्या माहिती फलकासमोर शेतकऱ्यांची पावले आवर्जुन थबकतात. विषमुक्त शेतमाल पिकवणाऱ्या सुनंदा सालोटकर या `कापूस कोंड्याची गोष्टʼ या फलकातून समोर येतात. ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, वरी, सावा या भरडधान्यांचे पोषणमूल्य मांडणारा फलक लक्षवेधी आहे. `आरोग्यवर्धीनी परसबाग’ या फलकातून घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला मिळवणे कसे शक्य आहे, हे विशद केले आहे. बोदवड तालुकयातील नागली, पालक, टोमॅटो व जीरे यांचे पापड अमेरिकेत कसे पोहोचले हेही प्रदर्शनातील यशोगाथेतून समोर येते. शेतीमालाचा वाळवण व प्रक्रिया उद्योग, तोही सौर उर्जेच्या माध्यमातून यशस्वीपणे समोर येतो. स्ट्राॅबेरीचा हेलो डाब ब्रँड सर्वांना चकीत करणारा आहे.