मुंबई –मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ स्फोटके ठेवण्याचा कट मुंबई पोलिस दलाचे वादग्रस्त अधिकारी असलेले वाजे यांनीच रचल्याचे पुढे आले आणि त्यातून पोलिस दल आणि गृहखात्यातील गैरव्यवहार, खंडणीची प्रकरणे पुढे आलीत. त्यात तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह अडकले. तेव्हापासून ते अजूनही कुणाला सापडलेले नसले, तरी त्यांच्या काळात केलेली एक एक कृत्ये आता समोर येत आहेत. पोलिस बळाचा गैरवापर करून परमबीर यांनी त्यांच्या जवळच्या मित्राला एका गुन्हयात संरक्षण देण्याचा प्रकार घडल्याचे आता समोर येत आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आता या मित्राला केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांनी जामीन फेटाळला आहे.
परमबीर सिंहांना आणखी अडचणीत आणणाऱ्या आणि त्यांचा अगदी जवळचा मित्र असलेल्या या संशयिताचे नाव संजय पुनामिया असे आहे. इतके दिवस तो आजारपणाचे कारण देऊन कारवाईपासून स्वत:ला वाचवत होता. विशेष म्हणजे त्याला परमबीर सिंहांचीच मदत मिळत होती. मागील पाच ते सहा वर्षे परमबीर सिंह त्याला पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून वाचवित राहिले. परमबीर यांनी पुनामियाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे. आणि ही खरेदी बनावट कागदपत्रांद्वारे करण्यात आल्याने याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे.
तर परमबीर यांचा हा जिगरी मित्र एका आर्थिक घोटाळ्यात अडचणीत सापडला होता. ते साल होतं 2016. पण प्रत्यक्षात त्याच्यावर कारवाई न होता इतर जे साथीदार आहेत, श्यामसुंदर अग्रवाल, मुरलीधर अग्रवाल, मनोज पुरोहित, रतीलाल जैन यांच्या विरोधात एफआयआय दाखल करून पैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील चार्जशीट 2017 मध्ये दाखल करण्यात आले. त्यात गुन्ह्यातील सहभागी असलेला पुनामिया हा चक्क साक्षीदार करण्यात आला होता. या घटनेला पाच वर्षे झाली, त्याला वाचविणारे परमबीरही अडचणीत आले आणि अज्ञातवासी झाले, तेव्हा धीर आलेल्यांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा अशी मागणी पत्राद्वारे ठाणे येथील पोलिस आयुक्तांकडे केली. खरा प्रकार त्यातूनच उघडकीस आला.
पोलिसांनी मग जेव्हा या प्रकरणाची पुन्हा तपासणी केली आणि पाळेमुळे खणायला सुरूवात केली, तेव्हा त्यांच्या तपासात उघडकीस आलं की साक्षीदारच संशयित आहे. मात्र परमबीरांच्या कृपेने तो वाचत आलेला आहे. मग काय पोलिसांनी थेट साक्षदारालाच उचलले. मात्र संजय पुनामिया त्या विरोधात उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी गेले. त्यासाठी आजारपणाचे कारण देऊन उपचारासाठी रुग्णालयात भरतीही झालेत.
मात्र सरकारी पक्षाने पुनामियांच्या काळया करतुदींचा पाढा न्यायालयात वाचलाच शिवाय आजपर्यंत केवळ तत्कालिन पोलिस अधिकारी असलेल्या परमबीर यांनी दिलेल्या गैर पाठिंब्यामुळे आणि पोलिस बळाचा चुकीचा वापर केल्यामुळे संजय पुनामिया कायद्यापासून वाचू शकला. असा युक्तीवाद केला. असा युक्तीवाद केल्यावर तो न्यायालयालाही पटला आणि आता संजय पुनामियाचा अटकपूर्व जामीन नाकारला गेलाय. त्याला केव्हाही अटक होऊ शकते. या प्रकरणातून परमबीर यांच्या गैरकृत्यांवर आणखी प्रकाश पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.