नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सुमारे १३० कोटी रुपयांच्या तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण केले. राष्ट्रीय महासंगणक अभियान अंतर्गत स्वदेशी पद्धतीने विकसित केलेले हे महासंगणक पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे वैज्ञानिक संशोधनासाठी तैनात करण्यात आले आहेत. हवामान आणि हवामान संशोधनासाठी तयार केलेल्या उच्च कार्यक्षमतेच्या कॉम्प्यूटिंग प्रणालीचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.
या प्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा दिवस भारतासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठे यश आहे तसेच संशोधन आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या देशाच्या प्रगतीचे प्रतिबिंब आहे. “आजचा भारत शक्यतांच्या असीम क्षितिजावर नवीन संधी निर्माण करत आहे”, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारतातील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या तीन परम रुद्र महासंगणकांचा तसेच दिल्ली, पुणे आणि कोलकाता येथे ते तैनात करण्यात आल्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. हवामान आणि हवामान संशोधनासाठी खास तयार करण्यात आलेल्या ‘अर्क’ आणि ‘अरुणिका’ या उच्च-कार्यक्षमतेच्या संगणन (एचपीसी) प्रणालीच्या उद्घाटनाविषयी देखील सांगितले. पंतप्रधानांनी संपूर्ण वैज्ञानिक समुदाय, अभियंते आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी तीन परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्स देशातील युवकांना समर्पित केले तसेच तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला युवकांना १०० दिवसांव्यतिरिक्त २५ अतिरिक्त दिवस दिल्याची आठवण करून दिली. त्यांनी अधोरेखित केले की हे महासंगणक देशातील तरुण शास्त्रज्ञांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील आणि भौतिकशास्त्र, पृथ्वी विज्ञान आणि विश्व उत्पत्तीशास्त्र (कॉस्मॉलॉजी) या क्षेत्रातील प्रगत संशोधनांना मदत करण्यासाठी त्याचा उपयोग अधोरेखित केला. पंतप्रधान म्हणाले की, या क्षेत्रांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याची कल्पना केली आहे.
“डिजिटल क्रांतीच्या युगात, संगणकीय क्षमता हा राष्ट्रीय क्षमतेला समानार्थी बनत चालला आहे”, असे सांगत त्यांनी संशोधन, आर्थिक विकास , राष्ट्राची सामूहिक क्षमता, आपत्ती व्यवस्थापन, राहणीमान सुलभता, व्यवसाय सुलभता यामधील संधींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संगणकीय क्षमतांवरील थेट अवलंबित्व लक्षात आणून दिले. ते म्हणाले की उद्योग 4.0 मध्ये असे उद्योग भारताच्या विकासाचा आधार बनतात. भारताचे योगदान केवळ बिट आणि बाइट्सपर्यंत मर्यादित राहू नये तर टेराबाइट्स आणि पेटाबाइट्सपर्यंत वाढायला हवे यावर त्यांनी भर दिला. म्हणूनच आजचा प्रसंग भारत योग्य दिशेने वाटचाल करत आहे याचा दाखला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
आजचा भारत केवळ उर्वरित जगाच्या क्षमतेशी जुळवून घेण्यात समाधान मानू शकत नाही, तर वैज्ञानिक संशोधनाद्वारे मानवतेची सेवा करण्याची आपली जबाबदारी आहे असे मानतो यावर पंतप्रधानांनी भर दिला. “संशोधनाद्वारे आत्मनिर्भरता, आत्मनिर्भरतेसाठी विज्ञान ” हा भारताचा मंत्र आहे,असे सांगत पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या ऐतिहासिक अभियानांचा उल्लेख केला. भारताच्या भावी पिढ्यांमध्ये वैज्ञानिक रुची रुजवण्यासाठी शाळांमध्ये १० हजार हून अधिक अटल टिंकरिंग लॅबची निर्मिती, STEM विषयांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीत वाढ आणि यंदाच्या अर्थसंकल्पात घोषित केलेल्या १ लाख कोटी रुपयांच्या संशोधन निधीचाही त्यांनी उल्लेख केला. भारताला २१ व्या शतकातील जगाला नाविन्यपूर्ण संशोधनांसह सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
विविध क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीवर भर देताना, विशेषत: अंतराळ आणि सेमीकंडक्टर उद्योगांवर लक्ष केंद्रित करून पंतप्रधान म्हणाले की, आज असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे भारत धाडसी निर्णय घेत नाही किंवा नवीन धोरणे आणत नाही. “अंतराळ क्षेत्रात भारत एक महत्त्वपूर्ण शक्ती बनला आहे”, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या वैज्ञानिकांनी मर्यादित संसाधनांसह तेवढेच यश मिळवले आहे जे इतर देशांनी अब्जावधी डॉलर्स खर्च करून मिळवले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत पहिला देश बनल्याचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. ते म्हणाले, ही कामगिरी देशाच्या अंतराळ संशोधनातील चिकाटी आणि नवोन्मेषाचा दाखला आहे. अंतराळ क्षेत्रातील भारताच्या भविष्यातील उद्दिष्टांविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, “भारताची गगनयान मोहीम केवळ अंतराळात पोहोचण्यापुरती नाही; तर आपल्या वैज्ञानिक स्वप्नांच्या अमर्याद उंचीवर पोहोचण्याची आहे.” २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या पहिल्या टप्प्यासाठी सरकारने अलीकडेच मंजुरी दिल्याचा त्यांनी उल्लेख केला, ज्यामुळे अंतराळ संशोधनात भारताचे अस्तित्व वाढेल.
आजच्या जगात सेमीकंडक्टरच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला . ते म्हणाले, “सेमीकंडक्टर हा विकासाचा एक आवश्यक घटक बनला आहे.” त्यांनी या क्षेत्राला बळकट करण्यासाठी ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ सुरू केल्याचा उल्लेख केला आणि अल्पावधीतच मिळालेले सकारात्मक परिणाम अधोरेखित केले. भारत आपली सेमीकंडक्टर परिसंस्था तयार करत आहे, जी जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावेल यावर त्यांनी भर दिला. भारताच्या बहुआयामी वैज्ञानिक विकासाला आणखी बळ देणाऱ्या तीन नवीन “परम रुद्र” महासंगणकांचे उदघाटन करण्यात आल्याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.
सुपर कॉम्प्युटर ते क्वांटम कंप्युटिंग हा भारताचा प्रवास देशाच्या विशाल स्वप्नाचा परिणाम आहे असे सांगून पंतप्रधान मोदींनी भारताच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक प्रगतीवर भर दिला. त्यांनी निदर्शनास आणून दिले की सुपरकॉम्प्युटर हे पूर्वी फक्त काही देशांपुरते मर्यादित होते, परंतु २०१५ मध्ये राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग अभियान सुरु करून आता भारत आघाडीच्या जागतिक सुपरकॉम्प्युटर देशांच्या क्षमतांशी बरोबरी करत आहे. ते म्हणाले की देश क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये आघाडी घेत आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये भारताचे स्थान उंचावण्यात राष्ट्रीय क्वांटम मिशन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यांनी अधोरेखित केले की हे उदयोन्मुख तंत्रज्ञान जगाचा कायापालट करेल , माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उत्पादन, एमएसएमई आणि स्टार्टअप्समध्ये अभूतपूर्व बदल घडवून आणेल, नवीन संधी निर्माण करेल आणि भारताला जागतिक स्तरावर नेतृत्वासाठी तयार करेल.
विज्ञानाचा खरा हेतू केवळ नवोन्मेष आणि विकास एवढाच नसून सामान्य माणसाच्या आकांक्षांची पूर्तता करण्याचाही आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. डिजिटल अर्थव्यवस्था आणि यूपीआयची उदाहरणे देऊन भारत उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करतानाच या तंत्रज्ञानामुळे गरीबांना सक्षम करता येईल याकडेही लक्ष पुरवत असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. अलीकडे सुरू केलेल्या ‘मिशन मौसम’विषयी त्यांनी माहिती दिली; या मोहिमेचे उद्दीष्ट देशाला हवामानाचा सामना करण्यास सज्ज आणि अंदाज घेण्यात स्मार्ट बनवण्याचे आहे. उच्च कार्यक्षमता असलेल्या संगणन (एचपीसी) व्यवस्था आणि सुपरकॉम्प्युटरमुळे हवामानाचा अंदाज वर्तवण्याच्या भारताच्या क्षमतेत वाढ होईल आणि अंदाज अधिक अचूकतेकडे जातील, असे त्यांनी सांगितले. दूरवरील गावांमध्ये सुपरकॉम्प्युटरच्या सहाय्याने हवामान आणि मृदा विश्लेषण हे वैज्ञानिक यश तर आहेच मात्र त्याचबरोबर हजारोंच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता त्यात आहे. “अगदी लहानात लहान शेतकऱ्यांपर्यंत जगातील उत्कृष्ट ज्ञान पोहोचेल आणि त्याआधारे त्यांना पिकांबाबत निर्णय घेता येतील, अशी खात्रीशीर व्यवस्था सुपरकॉम्प्युटरमुळे अस्तित्वात येईल. मासेमारांना समुद्रात जाताना पत्करावे लागणारे धोके कमी करण्यासाठी आणि विमा योजनांविषयी जाणून घेण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा फायदा होईल,” असे ते पुढे म्हणाले. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की भारत आता एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित मॉडेल्स विकसित करण्यासाठी आणि मशीन लर्निंगसाठी सक्षम होईल आणि त्याचा फायदा सर्व भागधारकांना होईल.
भारताची सुपरकॉम्प्युटर निर्माण करण्याची क्षमता ही राष्ट्रीय अभिमानाची बाब असून तिचे फायदे हळूहळू सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसू लागतील, भविष्यात त्यात लक्षणीय बदल होतील. एआयच्या आणि मशीन लर्निंगच्या या युगात सुपरकॉम्प्युटर महत्त्वाची भूमिका बजावतील, असे पंतप्रधान म्हणाले. या यशाची तुलना त्यांनी भारताच्या5जी तंत्रज्ञानातील आणि मोबाईल फोनच्या उत्पादनातील यशाशी केली; 5जी तंत्रज्ञानामुळे देशात डिजिटल क्रांतीला खतपाणी मिळाले आणि मोबाईल फोनमुळे प्रत्येक नागरिकाच्या हातात हे तंत्रज्ञान आले. मेक इन इंडिया उपक्रमावर भर देत पंतप्रधानांनी सांगितले की सुपरकॉम्प्युटर नव्या संशोधनाला दिशा देऊन नव्या शक्यता निर्माण करेल आणि जागतिक स्पर्धेसाठी भारताला सज्जता देईल अशा भविष्यातील तंत्रज्ञानाधारित प्रगतीसाठी मेक इन इंडिया उपक्रम सामान्य नागरिकांना तयार करेल. हे तंत्रज्ञान सामान्य जनतेला आयुष्यात ठोस फायदे मिळवून देईल आणि उर्वरित जगाच्या गतीशी जुळवून घेण्यासाठी त्यांना तयार करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
भाषणाच्या समारोपात पंतप्रधानांनी नागरिक आणि देशाचे या यशाबद्दल अभिनंदन केले आणि युवा संशोधकांना या आधुनिक सुविधांचा अधिकाधिक लाभ घेऊन विज्ञानात नवी कार्यक्षेत्रे खुली करण्यासाठी प्रोत्साहन दिले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमाला दूरदृश्य माध्यमातून उपस्थित राहिले होते.
वैज्ञानिक संशोधन सुकर करणार
भारताला सुपरकॉम्प्युटिंग तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनवण्याच्या कटिबद्धतेचा भाग म्हणून पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग अभियाना- (एनएसएम) अंतर्गत निर्माण केलेल्या देशी बनावटीच्या सुमारे 130 कोटी रुपये किमतीच्या तीन परम रुद्र सुपरकॉम्प्युटरचे राष्ट्रार्पण केले. हे सुपरकॉम्प्युटर पुणे, दिल्ली आणि कोलकात्यात वैज्ञानिक संशोधन सुकर करण्यासाठी बसवण्यात आले आहेत. फास्ट रेडिओ बर्स्ट्स् (एफआरबी) आणि खगोलशास्त्रातील इतर संशोधनासाठी पुणे स्थित जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी)ला सुपरकॉम्प्युटरची मदत होईल. दिल्ली स्थित इंटर-युनिवर्सिटी अॅक्सेलेरेटर सेंटर (आययूएसी) पदार्थ विज्ञान आणि आण्विक भौतिकशास्त्रासारख्या विषयांतील संशोधनाला गती मिळेल. कोलकात्यातील एस.एन. बोस सेंटरमध्ये भौतिकशास्त्र, विश्वउत्पत्तीविज्ञान आणि भू विज्ञानादी विषयांत अद्ययावत संशोधनाला चालना मिळेल.
हवामान संशोधनासाठी खास विकसित करण्यात आलेल्या उच्च कार्यक्षमतेच्या संगणन (एचपीसी) व्यवस्थेचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. हा प्रकल्प 850 कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात आला असून हवामानशास्त्रात संगणन क्षमतांच्या वाढीच्या दिशेने भारताने घेतलेल्या झेप यातून प्रतीत होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिओरोलॉजी (आयआयटीएम), पुणे आणि नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्ट (एनसीएमआरडब्ल्यूएफ), नोएडा या दोन महत्त्वाच्या स्थळी उभारलेल्या या एचपीसी व्यवस्थेत संगणनाची असामान्य क्षमता आहे. नव्या एचपीसी व्यवस्थांचे त्यांचा सूर्याशी असलेला संबंध दर्शवण्यासाठी ‘अर्का’ आणि ‘अरुणिका’ असे नामकरण केले आहे. या हाय-रिझोल्युशन मॉडेलमुळे विषुववृत्तीय चक्रीवादळे, मुसळधार पाऊस, वीजेच्या कडकडाटासह होणारी वादळे, गारपीट, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि इतर महत्वाच्या हवामानातील घटनांबाबत पुरेसा पूर्व अंदाज अधिकाधिक अचूक वर्तवणे शक्य होईल.