परळी – येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दगडी कोळश्याबरोबर इंधन म्हणून बायोमास ब्रिकेट अर्थात बांबूच्या तुकड्यांचा वापर करण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले असून, या केंद्राच्या महानिर्मिती विभागातर्फे बांबू पुरवठ्यासाठी दोन दिवसापूर्वी निविदा काढण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार व राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी या संदर्भात केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. श्री. पटेल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
श्री . पटेल यांनी पत्रकात म्हटले आहे की , ग्लास्गो येथे झालेल्या पर्यावरण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन सन 2050 पर्यंत 50 टक्के कमी करण्याचा संकल्प जाहीर करत इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या दगडी कोळश्याला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक बांबू आणि जैवभारावर आधारित इंधन विटाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रत्येक राज्यातील किमान एका औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दहा टक्के जैवभारावर आधारित इंधन विटा अथवा बांबूचा वापर बंधनकारक असल्याबाबतचे परिपत्रक जारी केले होते.
पंतप्रधान मोदी यांच्या या संकल्पनेला महाराष्ट्रात मूर्त रूप देण्यासाठी राज्य सरकारकडे आपण पाठपुरावा केला होता. 16 जुलै 2021 रोजी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून औष्णिक वीज निर्मिती केंद्रात इंधन म्हणून बांबू अथवा जैवभार इंधन विटाचा वापर करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रात जैवभार अर्थात बांबूचा वापर करण्याच्या अनुषंगाने ऑगस्ट 2021 मध्ये अभ्यास समिती गठीत केली होती. आता औष्णिक वीज निर्मिती केंद्रातर्फे ब्रिकेट अर्थात बांबूचे तुकडे पुरवठा करण्यासाठी दोन दिवसापूर्वी निविदा काढण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच लातूर येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पाशा पटेल यांच्या संपर्क कार्यालयात बांबू लागवडीसंदर्भात बैठक घेऊन उद्योजकांना मार्गदर्शन करून बॉयलरमध्ये दगडी कोळश्याऐवजी पर्यावरणपूरक बांबूचा वापर वाढवून पंतप्रधानांच्या संकल्पनेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले होते.
श्री. पटेल यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, बांबू शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी आपण सुरु केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतीसाद मिळत असून, हजारो शेतकऱ्यांनी बांबूची शास्त्रशुध्द लागवड करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या बांबूला चांगला भाव मिळावा व दगडी कोळसा जाळल्यामुळे हवेतील वाढणारे कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्याच्यादृष्टीने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. इंधन म्हणून बांबूचाही वापर करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होणार असून, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बांबूची लागवड करावी, असे आवाहन श्री. पटेल यांनी केले आहे.