परळी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘बोलणाऱ्यांचे अंबाडे विकतात आणि न बोलणाऱ्यांचे गहूही विकत नाहीत. पण, आता बोलायची वेळ आली आहे,’ असे विधान करत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे इशारा दिला आहे. मात्र, हा इशारा नेमका कुणासाठी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पंकजा मुंडे राजकीय क्षेत्रात त्यांच्या वक्तव्यांमुळे गाजताहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे त्या भाजप सोडणार असल्याची चर्चा रंगत आहे. तर कधीकधी त्या कुठेही जाणार नसून भाजपातच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतेच केलेले वक्तव्य भाजपासाठी इशारा मानला जात आहे.
परळी तालुक्यातील शेलु येथे जलजीवन मिशन अंतर्गत विकास कामाचा शुभारंभप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या,‘आता नारळ फोडताना काही लोकांनी माझ्या हातात नारळ दिला आणि नारळ फोडायला सांगितले. पण मला हे अवघड जातंय. आता मी नारळ फोडायला सुरुवात केली आहे. मागच्या पाच वर्षात मी नुसती कामे दिली. नारळ कुणी फोडले? माहीत नाही. पण आता नारळ फोडून-फोडून माझा तर हातच दुखायला लागला आहे. त्यामुळे मी त्यांना म्हटले, आता माझ्याकडून नारळ फोडणे शक्य नाही, तुम्हीच नारळ फोडा. मी काही इथल्या कामाचे श्रेय घ्यायला आले नाही. पण आता काय करणार? कारण आता जग वेगळे आहे. आता बोलणाऱ्यांचे अंबाडे विकतात आणि न बोलणाऱ्यांचे गहूही विकत नाहीत. त्यामुळे आता बोलायची वेळ आली आहे. आपण आपले वाजवून सांगितले नाही, तर लोकांच्या लक्षात येणार नाही.’
बहिणभावात होतोय संघर्ष
गेल्या काही दिवसांपासून परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिणभावामध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. आपापल्या काळात केलेल्या विकासकामांवरून दोघांमध्येही संघर्ष सुरू आहे.
Parali BJP Leader Pankaja Munde Threat Politics