नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पापड प्रेमींसाठी नाशिक मध्ये पापड महोत्सव होणार आहे. सहकार भारती व राणी भवन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे दि १२ व १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळात आयोजन करण्यात आले आहे. गरीब, होतकरू महिला तसेच महिला बचत गटांना मार्केट मिळावे या प्रमुख उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र वैशाखाचे दिवस सुरू झाले की कधीकधी नकळत मन बालपणात जाते. घराघरांतून कुरडया, पापड, बटाट्याचा कीस, बटाट्याचे पापड, उडदाचे पापड, नागलीचे पापड, सांडगे पोह्याचे पापड हे सर्व करण्याची धावपळ असायची, त्याचबरोबर त्याच्यासाठी बनविलेले पीठ खाणे हा पण एक मजेशीर अनुभव असायचा. गव्हापासून बनवलेला गरम गरम चीक हा पौष्टिक तर आहेच परंतु खायला ही खूप छान लागायचा. उडदाचे पापड करताना उडदाच्या पापडाची लाटी तेल घालून खाण्याची चव अप्रतिम असायची. पोह्याचे पापड करताना त्याचे पीठ (डांगर) म्हणजे तर एक नाश्ताच असायचा. नागलीचे पापड बनवताना घेतलेल्या खीशीची अप्रतिम चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. तसेच साबुदाण्याच्या पापड्या, बटाट्याचे वेफर्स, बटाट्याचा कीस, चकली हे वर्षभरासाठी घराघरातून सारे बनवले जायचे. परंतु आताच्या धकाधकीच्या काळात हे वाळवण मिळणं किंवा करणे हे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. परंतु अजूनही कित्येक घरांमधून हे वर्षासाठीचे वाळवण बनवले जाते. पण आता हे वाळवण सर्वासाठी सहज उपलब्ध होणार आहे.
सहकार भारती व राणीभवन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात पापड महोत्सव संपन्न होत आहे. या महोत्सवात सर्व प्रकारचे पापड, कुरडई, सांडगे आपल्याला थेट बनविणाऱ्या सुगरणींकडून उपलब्ध होणार आहे.आपण या पापड महोत्सवास भेट देऊन आपल्या वर्षभराच्या वाळवणाची मनसोक्त खरेदी करावी. आपण स्वतः तर या महोत्सवाला भेट द्याच पण आपले मित्र नातेवाईक यांनाही आग्रहाने या महोत्सवास भेट देण्यास सांगा, वाळवणाबरोबरच तेथे उडदाच्या पापडांच्या लाट्या, गव्हाचा ताजा चीक, नागलीची खिशी इत्यादी पारंपारिक पदार्थाचाही आपल्याला आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सवात पापड, बटाटा पापड, वेगवेगळ्या कुरडई, डाळींचे वडे, शेवई, वेफर्स, उपवासाच्या पापड्या, साबुदाणा चकली, याच बरोबर वेगवेगळे पापडाचे पीठ, नाचणी पीठ, नाचणी भाकरी याची सुध्दा मेजवानी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
हा पापड महोत्सव १२ आणि १३ एप्रिल रोजी लक्षिका मंगल कार्यालय, सिटी सेंटर मॉल समोर नाशिक येथे भरवला जाणार आहे. हा महोत्सव दोन्ही दिवशी सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत चालणार आहे. समस्त नाशिककरांनी या महोत्सवास भेट दिल्यास महिला बचत गट व होतकरू महिलांना त्यांचा व्यवसाय उभा राहण्याकरता मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सर्व नाशिककरांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन सहकार भारती प्रदेश संघटनमंत्री शरद जाधव, नाशिक शाखा अध्यक्ष डॉ. प्रशांत पुरंदरे तसेच पापड महोत्सव आयोजन समिती मार्फत करण्यात आले आहे. स्टॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क सुजाता कुलकर्णी यांच्याशी ९७६२२६८५९२ या क्रमांकावर संपर्क साधावा ते आवाहनही* आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.