पनवेल (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला स्नॅपचॅटद्वारे नग्न छायाचित्रे पाठवण्यास भाग पाडल्याप्रकरणी नाशिक येथील १९ वर्षीय तरुणाला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सिराज चौधरी असे या तरुणाचे आहे. फोटो सोशल मिडियात व्हायरल करण्याची धमकी देत चौधरीने मुलीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती.
पनवेलच्या तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सध्या आठवी इयत्तेत आहे. ती खेळण्यासाठी तिच्या आईचा मोबाईल फोन वापरते. याच काळात सहा ते सात महिन्यांपूर्वी स्नॅपचॅटवर तिची सिराज चौधरीशी मैत्री झाली. त्यांच्यातील संवाद नंतर व्हॉट्सअॅपवर गेला. जशी त्यांची मैत्री वाढत गेली, आरोपीने पीडितेला नग्न फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास सांगितले. तिने नकार दिला. मात्र, या मैत्रीबद्दल पालकांना सांगण्याची धमकी त्याने मुलीला दिली. त्यामुळे ती घाबरली आणि पीडिता सापळ्यात अडकली. त्याने मागणी केलेले फोटो तिने पाठवले, असे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर आरोपी पनवेल येथे आला आणि त्याने मुलीची भेट घेतली. तसेच त्याने दोघांचा एकत्र फोटो काढला. नग्न फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित करण्याची धमकी देत सिराजने मुलीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याने पीडितेचे नाव आणि फोटो वापरून बनावट इंस्टाग्राम अकाउंटही तयार केले.
या सर्व बाबीची माहिती मिळताच पीडितेच्या नातेवाईकांनी तिच्या पालकांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हे प्रकरण गांभीर्याने घेत, सिराज चौधरी विरुद्ध मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये विनयभंग, खंडणी व धमक्या दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे जगदीश शेलकर, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश फुले, अविनाश पाळदे, अंबीकर अंधारे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने तांत्रिक तपास केला. आरोपी सिराज चौधरीला नाशिकच्या भारतनगर परिसरात शोधून काढले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सिराज चौधरीकडे चौकशी केली, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान, सिराज अहमद आबिद अली चौधरी (वय १९) याला न्यायालयाने २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.