मुंबई – माजी मंत्री आणि भाजप नेत्या यांची भावनिक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांच्या खासगी अंगरक्षकाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या पंकजा यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.
पंकजा यांची पोस्ट अशी
“गोविंद, अरे गोविंदा “अशी हाक
मी २००९ पासून किती वेळा मारली असेल..माझ्या तोंडात तीळ भिजत नव्हता अगदी..
आज पहाटे त्याच्या मोबाइलवरून फोन आला. मला वाटलं चमत्कारच झाला आणि गोविंदा शुद्धीवरआला…पण नाही, असे चमत्कार होत नाहीत..३ जूनला कळलं आहेच..
“वाघ हो माझा” त्याची पत्नी तिकडून आक्रोश करत होती. मी ही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप मोठा हुंदका आला, माझं मलाच आश्चर्य वाटलं…इतकी खंबीर मी..कशी कोसळले!
पण काही नाते आपल्या आयुष्यात एक जागा भरतात आणि ती पूर्णपणे रिक्तही करतात…जी कधीच भरू शकत नाहीत.
मोठ मोठया डोळ्यांचा, चुणचुणीत, पहिलवान टाईप हा गोविंद..२००९-१० च्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमच्या आयुष्यात आला. माझ्या गाडीवर हल्ला झाला होता, निवडणूक हिंसक वळण घेत होती. ५-६ जण सतीश, गोविंद, अंगद, गंगा, प्रल्हाद, सुरेश हे माझ्याकडे आले. बाकी जण कमी बोलायचे पण गोविंद, म्हणाला, “आम्हाला तुमचं अंगरक्षक व्हायचयं.” तुमचे ‘भाऊ’ म्हणून तुमच्यामागे रहायचं आहे. आम्हाला जिथे जाल तिथे जेवण द्या बस.. बाकी काही नको. मुंडे साहेबांचा वारस तुम्ही आम्हाला जपायचं आहे. खरंच!! जपलं हो या पोरांनी… एक घरी बसला. एक व्यवसायात गेला. पण गोविंद, गंगा, प्रल्हाद, सुरेश आजपर्यंत राहिले. प्रीतमताई राजकारणात आल्यावर नवख्या असल्याने मी त्यांना हे trained लोकं दिले. पण, एके दिवशी गोविंद ला म्हणाले ‘तू माझ्याबरोबर परत ये बाबा गर्दी आवरताना प्रॉब्लेम होतो’…
हे सर्व चप्पल, शर्ट, पॅन्ट घालत होती. ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ सुरू होणार होती. त्याआधी कांही दौऱ्यात पोरांचे पाय इतके तुडवले गेले की सुजून गेले. मग, पोलिसांसारखे बूट घेतले. संघर्ष यात्रेच्या गर्दीत एक सारखे दिसावे व ओळखू यावे म्हणून सारखे सफारी शिवले. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांचं ‘कडं’ मला सुरक्षित करायचं. त्या कड्यातील एक गडी निखळला. माझ्या केसालाही धक्का न लावण्यासाठी माझ्या या भावांनी इतके कष्ट घेतले की बस्स! मी कुठे कार्यकर्त्याकडे गेले की, बदाम-काजू दिले की मुठीत घ्यायचे आणि यांच्या हातात द्यायचे, कारण त्यांची वरात माझ्याबरोबर उपाशी- तापाशी.. कोणी साखर घातली कोणी पेढा दिला, प्रसाद दिला न मागताच हात वळवला आणि टाकला तो झेललाच यांनी गोड मी जास्त खाऊ नये म्हणून…
https://twitter.com/Pankajamunde/status/1385084314606395393