मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मालेगाव शहरामध्ये कापडावर प्रक्रिया करणारे एकूण १५९ सायझिंग उद्योग सध्या कार्यरत असून, शहरातील वातावरण हवा गुणवत्ता ही सर्वसाधारणपणे ‘मध्यम’ स्तरावर आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि परवानगीविना चालणाऱ्या सायझिंग उद्योगांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
विधान परिषदेत सदस्य डॉ. परिणय फुके यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी प्रवीण दरेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
या सायझिंग उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक संमती प्रदान करण्यात आली असून, मालेगाव महानगरपालिकेचा ना-हरकत दाखला प्राप्त झाल्यानंतरच संमतीपत्र देण्यात आली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगांमध्ये औद्योगिक कारणासाठी अल्प प्रमाणात पाण्याचा वापर केला जात असून, प्रक्रियेमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. बॉयलरसाठी प्रामुख्याने लाकडाचा वापर केला जात असून, धुलीकण नियंत्रणासाठी डस्ट कलेक्टर व धुरांडे (चिमणी) बसविण्यात आल्या आहेत.
वातावरणीय हवा गुणवत्ता मापन केंद्र मालेगावमध्ये कार्यरत असून, प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सातत्याने तपासण्या केल्या जातात. यावेळी आढळलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने, अवैधरित्या इंधन म्हणून प्लास्टिक स्क्रॅपचा वापर, तसेच सांडपाणी प्रक्रिया संयंत्रातील दोष यामुळे पुर्वी चार सायझिंग उद्योगांवर बंदी आदेश जारी करण्यात आले होते, अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.