मुंबई – मला दबावतंत्राचे राजकारण करायचे नाही. कोणतेही पद मिळवण्यासाठी राजकारणात आले नाही. लोकांचे काम करण्यासाठी मी राजकारणात आले. मंत्रीपदाची मागणी हे मुंडे साहेबाचे संस्कार नाहीत. मला सत्तेची लालला नाही, मला खुर्ची नको असे सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी दिल्लीहून आल्यानंतर मुंबईत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांशी समजूत काढत त्यांचे राजीनामे सुध्दा नामंजूर केले.
गेल्या काही दिवसापासून मंत्रीपद न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्याला उत्तर देतांना त्यांनी सांगितले की, मला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरल्या गेल्या. यावेळी त्यांनी दिल्लीत झालेल्या चर्चेबाबत माहिती देतांना सांगितले की, मला दिल्लीत कोणीच झापलं नाही. पंतप्रधान मोदी यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिली. कार्यकर्त्यांची नाराजी दूर कराल असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी माझा नेता मोदी, माझा नेता अमित शाह आणि, जे.पी.नड्डा असेही सांगितले.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना सांगितले की, माझ्या डोळ्यात पाणी पाहून तु्म्ही राजीनामे दिले. मोठा नेता नेहमी त्याग करतो. पक्षाने दिलेले मी लक्षात ठेवते, नाही दिलेले कार्यकर्ते लक्षात ठेवतात. आपली एकजुट कमी करण्याचा डाव सफल होऊ द्यायचा नाही. माझ्या समाजाच्या मंत्र्याला मी कशाला अपमानित करु असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत धर्मयुध्द टाळायचा प्रयत्न करणार. मी कुणाला भीत नाही, माझ्यावर निर्भय राजकारणाचे संस्कार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय़ घ्यायचा असतो. यावेळी त्यांनी महाभारतातील उदाहरण देत काहीं नेत्यांवर निशाणाही साधला.