चंदीगड – कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी चरणजीत सिंह चन्नी यांचे नाव निश्चित केले आहे. काँग्रेसचे प्रभारी हरिश रावत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. याअगोदर सुखजिंदर सिंह रंधावा यांचे नाव जवळपास निश्चित होते. पण, चन्नी यांच्या नावावर काँग्रसने अखेर शिक्कामोर्तब केले. चन्नी हे दलित शिख आहेत. उद्या सकाळी ११ वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज नवीन मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार हालचाली सुरु होत्या. सकाळी सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या अंबिका सोनी यांन ऑफर दिली. पण, त्यांनी त्यास नकार दिल्यामुळे पेच निर्माण झाला होता. या पदासाठी अमरिंदर सिंग यांचे जवळचे सुनील जाखड, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू, प्रताप बाजवा यांची नावे चर्चेत होते. पण, आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळावे यासाठी काँग्रेस मुख्यमंत्रीपदासाठी दलित शीख असलेल्या चन्नी यांची निवड केली.
पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यात कॅप्टन कमी पडतील याची कुणकुण काँग्रेस नेतृत्वाला लागल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे बोलले जात आहे. पण, या राजीनाम्यानंतर कोणाला मुख्यमंत्री करायचे हे निश्चित नसल्यामुळे काँग्रेसपुढे पेच होता. दरम्यान काँग्रेसने नवज्योतसिंग सिध्दू यांचे नाव पुढे केले तर त्याला अमरिंदर सिंग जोरदार विरोध करणार असल्यामुळे या पेचात आणखी भर पडली. पण, सायंकाळी काँग्रेसने सर्वांना धक्का देत चन्नी यांच्या नावाववर शिक्कामोर्तब केले.
आतापर्यंत पंजाब काँग्रेसच्या राजकारणात कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा एकसूत्री कारभार राहिला आहे. त्यांनी १९९८ मध्ये आपल्या अकाली दल (पंथिक) पक्षाचा काँग्रेसमध्ये विलय केला होता. चार वर्षांनंतर २००२ मध्ये ते मुख्यमंत्री झाले. २०१७ मधील निवडणुकीत काँग्रेसला कॅप्टन यांच्यामुळेच यश मिळाले. परंतु गेल्या साडेचार वर्षांत निवडणुकीतील आश्वासनांना पूर्ण करण्यास ते अपयशी ठरल्यामुळे त्यांना हे पद सोडावे लागले. आता चेन्नी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या जाणार असून त्यात काँग्रेसला कितपत यश मिळेल हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.