नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चुंचाळे शिवारातील दत्तनगर परिसरात अनेक दिवसांपासून गावगुंड दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असून येथील अनधिकृत व्यवसाय या दहशतीस कारणीभूत असल्याचा आरोप येथील रहिवासी करत आहेत. पाच पन्नास जणांचे टोळके येऊन ही दहशत माजवत असून यामुळे दत्तनगर वासियांमध्ये प्रचंड भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
दोन तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास पाच पन्नास जणांचे टोळकं अचानक येऊन भर चौकात शिवीगाळ करू लागला. काहींच्या हातात लाकडी दांडे तर काहींच्या हातात हत्यारे असल्याचे येथील काही रहिवाश्यांच्या म्हणणे असून प्रसंगी कोणासही दमदाटी करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडत होता. तर काहींनी हातात दगड उचलून थेट कोणाच्याही घरावर दगड़फेक करत होते. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
याआधी देखील एक वर्षापूर्वी याच गावगुंडांनी एक गरोदर महिलेच्या घरात जाऊन थेट तिच्या पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याची माहिती समोर येत असून याबाबत सोशल मीडियावर याबाबत व्हिडीओ समोर आलेला आहे. तर येथील महिलांना देखील घराबाहेर निघणे जिकरीचे झाले असून संध्याकाळ झाली की महिला घराबाहेर निघाली तर काही विपरीत घटना घडल्यास यास जबाबदार कोणास धरावयाचे असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
येथे सुरु असलेले अनधिकृत व्यवसायावर अंकुश लावण्यास पोलीस प्रशासन सक्षम अपयशी तारात असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून पोलीस अश्या गावगुंडांवर काहीही कार्यवाही करत नाहीत याउलट त्यांच्यावर कृपाआशीर्वाद असल्याचाही थेट आरोप येथील रहिवाश्यांनी केला आहे. या गावगुंडांच्या जाचाला त्रासून अनेक नागरिकांनी येथून त्यांचे घरदार सोडून दुसरीकडे राहायला जाणे पसंद केले आहे. या गावगुंडांवर व येथील अनधिकृत व्यवसायावर पोलीस प्रशासनाने आताच आळा घालणे गरजेचे असून असे न झाल्यास आता जनताच अशा गुंडांच्या घरांवर मोर्चा काढणार असल्याची महत्वाची बाब समोर येत आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देखमुख यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत आज संध्याकाळी आपणास प्रतिक्रिया देईल असे सांगण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाचा धाक कमी झाला.
गावगुंड थेट नागरी वस्तीत प्रवेश करून कोणाही रहिवाश्यास शिवीगाळ करत असून कोणालाही मारहाण करण्यापर्यंत यांची मजल पोहचली आहे. यांच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा काहीही धाक शिल्लक राहिला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे असून या दगडफेकीचा व गरोदर महिलेस मारहाण केल्याचा व व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. हा प्रकार घडल्यानंतर अजूनही या गावगुंडांवर काहीही कार्यवाही का झाली नाही असा सवाल मात्र उपस्थित करण्यात येत आहे.
गांवकरीच अशा गुंडांच्या घरांवर थेट मोर्चा काढणार
या गावगुंडांनी दहशत दिवसेंदिवस वाढत असून यावर आताच कार्यवाही न झाल्यास आता थेट गावकरीच अशा गुंडांच्या घरांवर थेट मोर्चा काढणार आहे. तर या आधी देखील वर्षभरापूर्वी याच गावगुंडांनी एका गरोदर महिलेच्या घरात जाऊन तिच्या ओटीवर लाथा मारल्याचा प्रकार घडला आहे. एकंदरीत या गावगुंडांवर पोलीस प्रशासनाचा धाकच उरलेला नाही असे निदर्शनास येत आहे.
साहेबराव दातीर, सामाजिक कार्यकर्ते
अवैध धंद्यांवर कारवाई होणे गरजेचे
गावगुंडांच्या दहक्षतीमुळे येथील अनेक नागरिकांनी परिसरच सोडून दुसरीकडे राहायला जाणे गरजेचे समजले असून आई बहिणींच्या सुरक्षतेचा प्रश्न देखील उपस्थित राहत आहे. यावर आता तरी पोलीस प्रशासनाने कठोर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तर येथील अवैध धंद्यांवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे.
समाधान शिंदे ,गांवकरी