मनमाड : शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या मनमाड – नांदगाव रोड येथील पानेवाडी शिवारात आव्हाड वस्ती येथे दुपारच्या सुमारास राहत्या घरातून १४ हजार रुपये किंमतीचे डिझेल ५० लिटर व पेट्रोल ७५ लिटर रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात हस्तगत केला असून दोन व्यक्तींना तब्यात घेतले आहे. यातील एक व्यक्ती रेल्वे कर्मचारी आहे. यामुळे या छाप्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली होती.
शहरापासून जवळ पानेवाडी शिवारात इंधन कंपन्यांचे आगार आहे. टँकरद्वारे उत्तर महाराष्ट्रात आणि रेल्वे द्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात इंधनाची वाहतुक होते.या इंधन कंपन्यांच्या प्रकल्पा जवळ रेल्वेच्या वॅगन डिझेल आणि पेट्रेल भरण्यासाठी रेल्वेचे स्वतंत्र टर्मिनल आहे.इंधनाने भरलेली रेल्वे गाडी रिकामी झाल्यानंतर सायडिंगला उभी केल्यानंतर तळाला असलेले रेल्वे वॅगनमधील पेट्रोल आणि डिझेल कॅनमध्ये भरून त्याची चोरी होते.अशी गुप्त माहिती मनमाड रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाला मिळाली आणि पथक निरीक्षण करत होते. शनिवारी सकाळी अशीच गुप्त माहिती मिळाल्यावर पथकाने पानेवाडी येथे धाव घेऊन सापळा लावला व विजय दशरथ सांगळे,वय २३ , विठ्ठल रामचंद्र सांगळे ( रेल्वे कर्मचारी )वय ४५ रा . पानेवाडी यांच्या घराच्या परिसरातून प्लॅस्टिक कॅनमध्ये भरलेले ५० लिटर डिझेल किंमत रूपये ५ हजार आणि ७५ लिटर पेट्रोल किंमत रूपये ९ हजार असा एकूण १४ हजार रूपयांचा मुद्देमाल वरील दोघांच्या घरातून लपून ठेवलेला मिळून आला. दोघांवर आरपीएफ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.यातील विठ्ठल सांगळे हा रेल्वे कर्मचारी असल्याने मोठी खळबळ उडाली. गेल्या काही वर्षापासून परिसरात इंधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. आजच्या छाप्यामुळे ती उघड झाली.
रेल्वे सुरक्षा बलाचे मंडल सुरक्षा क्षीतीज गुरव व सहाय्यक आयुक्त बी.पी. कशुवाह यांच्या नेतृत्वाखाली मनमाड रेसुबचे प्रभारी अधिकारी डि.के. मिश्रा, उपनिरिक्षक आर.एस. यादव, रेसुब कर्मचारी समाधान वाहुळकर, सागर वर्मा, मनिष कुमार, गजानन पाटील, विठ्ठल नागरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.