विशेष प्रतिनिधी, मुंबई
पंड्या स्टोर फेम अभिनेता अक्षय खरोडिया गेल्या काही दिवसांपासून चिंताक्रांत आणि हैराण झाला आहे. अक्षय खरोडिया याच्या नावाचा गैरवापर करून अज्ञात लोक युवतींकडून न्यूड फोटोंची मागणी करून पैसे मागत असल्याचे उघड झाले आहे. हे प्रकरण गेल्या चार वर्षांपासून सुरू असून, याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही.
याबाबत अक्षयने नुकतेच स्पॉटबॉयशी बोलाताना सांगितले, की माझ्या नावाचे आणि फोटोचे अनेक खोट्या अकाउंटवरून युवतींची फसवणूक केली जात आहे. ऋत्विक सिंह नावाचा एक व्यक्ती काही दिवसांपासून हे कृत्य करत असल्याचे मी ऐकले आहे. मी याविरोधात चार वर्षांपूर्वी तक्रार दाखल केलेली आहे. परंतु त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. पोलिस किंवा सायबर सेलकडून कोणतेच उत्तर मिळाले नाही.
हा व्यक्ती मी (अक्षय) बनून युवतींशी बोलतो. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतो आणि त्यांना न्यूड फोटोची मागणी करतो. नंतर तो युवतींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडे पैशांची मांगणी करतो. माझ्या माहितीप्रमाणे त्याने आतापर्यंत २० ते २५ लाख रुपये उकळले असतील. मला देशभरातून युवतींचे ईमेल आणि मेसेज येतात. मुख्य म्हणजे सोशल मीडियावर माझे पेज सध्या व्हेरिफाइड नसल्याने खरे आणि खोटे कोणते याबाबत लोकांना माहिती नाही.
या गोष्टीमुळे मी तणावत असतो. अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन कामे करणारे लोक कमजोर मनाच्या लोकांना जाळ्यात ओढतात. युवतीसुद्धा अशा लोकांच्या जाळ्यात अलगद अडकतात. त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलल्याशिवाय किंवा त्यांना पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय त्या कशा यामध्ये फसतात. सुरुवातीला मला एक किंवा दोन मेल येत होते. परंतु आता पीडित युवतींकडून एकामागून एक अनेक मेल्स आणि मेसेज येतात. हे कृत्य करणारा संशयित व्यक्ती त्याचे वडील पोलिसांत असल्याची बतावणी करतो. त्याच्या एका गर्लफ्रेंडचा कार अपघातात मृत्यू झाला अशी गोष्ट सांगून युवतींना भावनेच्या जाळ्यात अडकवतो आणि त्यांचा विश्वास संपादित करतो.
अक्षयचे आवाहन
युवतींनी अशा लोकांच्या जाळ्यात फसू नये. त्या व्यक्तीला मदत करण्याची इच्छा असेल किंवा त्यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा असेल, तरीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आधी त्या व्यक्तीबद्दल माहिती घ्या. त्याच्याशी व्हिडिओ कॉलवरून बोला आणि नंतर पुढचे पाऊल टाका, असे आवाहन त्याने केले आहे.