स्व. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. यादवराज फड यांचे गायन आणि षष्ठी पूर्ती सन्मान सोहळा १ डिसेंबर के.व्ही.एन.नाईक आर्टस कॅालेज , डोंगरे वस्तीगृह मैदान समोर दुपारी ४ वाजता होणार आहे. या निमित्त संगीतकार, गायक संजय गीते यांनी आपल्या मित्राच्या खडतर प्रवासावर लिहिलेला हा लेख…..
मराठवाड्यातील वरवटी सारख्या अत्यंत छोट्या गावातील हा आमचा मित्र आज पंडित यादवराज फड या नावाने भारतासह देश विदेशात ओळखला जातो. वरवटी ते राष्ट्रपती भवन असा प्रवास केलेला हा एक तगड्या सुरांचा प्रतिभावंत गायक माझी आणि यादवराज यांची ओळख झाली १९९० मध्ये गायनाच्या स्पर्धेच्या निमित्ताने. मी त्याकाळी अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, नगरच्या राज्यस्तरीय सुगम संगीत स्पर्धेत मी प्रथम आलो होतो आणि सांगलीच्या स्पर्धेमध्ये मात्र माझी डाळ शिजली नाही कारण तिथे प्रथम क्रमांक मिळवला होता.
यादवराज फड यांनी. तिथे आमची ओळख झाली आणि मग जी मैत्री जमली ती जमलीच. माझ्या वडिलांची बदली तेव्हा धुळे येथे होती मी बारावीला शिकत होतो धुळे ते पुणे असा मग माझा प्रवास सुरू झाला. सुखवस्तू घरातला मी. पण, थेट जायचो ते यादवराज यांच्या घरी, त्याला घर कसं म्हणायचं हाच प्रश्न आहे एका गोठ्याच्या शेजारी त्याला लागून एक छोटं पार्टिशन करून तयार केलेली एक छोटीशी खोली. पलीकडच्या शेणा मातीच्या गंधासह,वासरांच्या आवाजाच्या सान्निध्यात रियाझ करत असायचा. एक वाघाचा बछडा जो सातत्याने दहा दहा तास थरारून सोडणाऱ्या तानांचा पाऊस पाडत रियाज करायचा हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितल आहे. माझ्यासारख्या सुखवस्तू घरातल्या मुलाला त्या गोठ्याच्या शेजारच्या छोट्याशा जागेत आठ दिवस राहणं सुध्दा मुश्किल व्हायचं तिथे हा माणूस काही वर्ष होता. त्याच्या पूर्वीची परिस्थिती तर अधिक खडतर होती. यादवराज माधुकरी मागून मागून गुरुची सेवा करून गुरूकडून शुद्ध किराणा घराण्याचे ज्ञान मिळवत होते.
पंडित सदाशिवबुवा जाधव हे किराणा घराण्याचे गायक अब्दुल करीम खान, बानुबाई करीन खा साहेब यांच्याकडे तयार झालेले त्यांचे गायन हे शंभर नंबरी सोन्यासारखे शुध्द किराणा घराण्याचं गाणे ,असं पंडित भीमसेन जोशी नेहमी म्हणायचे सदाशिवबुवांच्या निधनानंतर पंडित भीमसेन जोशींकडे यादवराज सात वर्षे शिकले. दरम्यान त्यांनी संगीतोन्मेष नावाची संस्था स्थापन केली मीही त्या संस्थेचा काही वर्ष सदस्य होतो त्या व्दारे यादवराज यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली मार्गदर्शन दिलं त्याचप्रमाणे पुढे त्यांनी स्वतःचे अनेक शिष्य घडवले आजची आघाडीची गायिका बेला शेंडे सह अनेक शिष्य त्यांनी घडविले. .छोट्या छोट्या मैफिलीत गाण्याची मनीषा असलेला हा आमचा मित्र एक दिवस सवाई गंधर्व महोत्सवात गायला त्या दिवशी अगदी आनंदाने उर भरून आला. वरवटी गावचा हा छोटा मित्र थेट राष्ट्रपती भवनात गायला. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्यापर्यंत त्याच्या गायनाची कीर्ती पोहोचली त्यांच्या हिंदी अभंगाची फर्माईश पूर्ण करत करत ‘मधुरा बानी हिंदी अभंगाचा कार्यक्रम सूरु केला. दिल्ली,जोधपूर,जयपूर,कलकत्ता, राजकोट, बंगलोर, अजमेर, घुमान सह विदेशात शास्त्रीय संगीत आणि अभंग गायनाच्या शेकडो मैफिली करणारा आमचा मित्र साठाव्या वर्षात पाहोचला.
२००३ साली अखिल भारतीय वारकरी संमेलन असा आगळावेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला. गेली सोळा वर्ष त्यांनी हे संमेलन आयोजित केले,वारकरी संप्रदायातील नवरत्ने सारखी दोन/तीन पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे .वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने संस्कार संपन्न चारित्र्य संपन्न अशी विशेष ओळख तो टिकवून आहे. आलपयुक्त गायन, दमदार गमकयुक्त तान ही शास्त्रीय गायनाची वैशिष्ट्ये असलेल्या यादवराज यांनी स्वतः गहिनीकल्याण, उमारंजनी, राजकंस अशा नवीन रागांची निर्मिती केलेला हा मित्र राग गातो तसा रागावतोही, विनयशील असूनही कुणाचे चुकीचे अजिबात ऐकून घेत नाही आणि सेल्फमेड असल्याने स्वतःची वैचारिक चौकट बद्दल आग्रही असतो त्यांचा षष्ठी पूर्ती निमित्त सन्मान आणि त्यांच्या गायनाचा कार्यक्रम १ डिसेंबरला के. व्ही.एन. नाईक संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केला आहे धबधब्या सारख्या ताना ,आर्त आलापी,भक्तिरसात भिजलेली संतवाणी ऐकण्यासाठी रसिकांनी जरूर यावे…..