नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून ओळख असलेल्या तीन मूर्ती संकुलातील पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केल्यानंतर लगेच वर्षभरानंतर नेहरूंचे नाव येथून काढून टाकण्यात आले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी याला आता प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ संग्रहालय आणि सोसायटी म्हटले जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी या सोसायटीच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, राजनाथसिंह सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत. विरोधकांकडून गेल्या वारंवार मोदी सरकारवर देशाचा इतिहास बदलण्याचा, नावे बदलून काँग्रेसच्या खुणा मिटवण्याचा आरोप केला जात आहे. त्यातच आता थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शेवटपर्यंत वास्तव्य होते, त्या त्रिमुर्ती भवनमधून पंडित नेहरूंचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
नेहरूंचे तिथेच वास्तव्य
देशाचे राजधानी दिल्लीत तीन मूर्ती भवनमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर वास्तव्यास होते. सुमारे १६ वर्षं, पंडित नेहरू तिथेच वास्तव्यास होते. स्वातंत्र्यपूर्व काळात हे निवासस्थान भारताच्या कमांडर इन चिफचे होतं. दि. २७ मे १९६४ रोजी पंडित नेहरूंचे निधन झाल्यानंतर तत्कालीन केंद्र सरकारने हे निवासस्थान पंडित नेहरूंनाच समर्पित करून त्या ठिकाणी त्यांचे संग्रहालय आणि ग्रंथालय सुरू केले. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांनी तीन मूर्ती हाऊस हे निवासस्थान देशाला समर्पित केले सन १९६६ मध्ये त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एनएमएमएल अर्थात नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीची स्थापना करण्यात आली.गेल्या वर्षीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी ‘पंतप्रधान संग्रहालया’चं उद्घाटन केले होते. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच आता याच या म्युझियमला दिलेलं जवाहरलाल नेहरूंचे नाव वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
नेहरूंपासून मोदींपर्यंत
सन २०१६ मध्ये पीएम मोदींनी संकुलात भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित संग्रहालय उभारण्याची कल्पना मांडली. काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता, नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी कॉम्प्लेक्समध्ये पंतप्रधानांचे संग्रहालय बांधण्यात आले. दि. २१ एप्रिल २०२२ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. यापुर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहून तीन मूर्ती संकुलाचे स्वरूप बदलण्याच्या अजेंडाबद्दल चिंता व्यक्त केली होती. आता नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांविषयी या संग्रहालयात माहिती, दस्तावेज, फोटो ठेवण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने आता या संग्रहालयाच्या नावातून नेहरुंचे नाव काढण्याचा निर्णय झाला आहे. त्याऐवजी आता हे संग्रहालय ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ या नावाने ओळखले जाणार आहे.
सोसायटीवर हे आहेत
पंडित नेहरूंचं नाव वगळण्याचा निर्णय घेणाऱ्या एनएमएमएल सोसायटीच्या अध्यक्षपदी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय इतर २९ सदस्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी अशा इतर काही मंत्री व नेत्यांचा समावेश आहे. यासंदर्भात राजनाथ सिंह यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान हे एक पद नसून ती एक स्वतंत्र संस्थाच असते. कोणतेही इंद्रधनुष्य सुंदर दिसण्यासाठी त्यातील सर्व रंगांचं योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व होणे आवश्यक असते. तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे की, वास्तूंचे नामांतर करून हेरिटेज मिटत नाही. जयराम रमेश यांनीही ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ज्यांना इतिहास नाही, ते इतरांचा इतिहास पुसायला निघाले आहेत. नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलण्याचा दुर्दैवी प्रयत्न आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार आणि लोकशाहीचे निर्भय पहारेकरी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिमत्त्वाला कमी लेखू शकत नाही. यावरून भाजप-आरएसएसची खालची मानसिकता आणि हुकूमशाही वृत्ती दिसून येते. मोदी सरकारची बटू विचारसरणी ‘हिंदच्या जवाहर’चे भारतातील मोठे योगदान कमी करू शकत नाही!