विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
भारतीय राजकारणात एखाद्या गोष्टीविषयी मोठे वादंग उठते, त्यानंतर त्याचा खुलासा करत सारवासारव करण्यात येते. पंडित नेहरू यांच्या ‘कथित छायाचित्र ‘ प्रकरणी देखील असेच घडले आहे. भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करण्यासाठी पोस्टर्समध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे छायाचित्र समाविष्ट न केल्याबद्दल विरोधी पक्षांच्या टीकेला सामोरे जाताना, भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेने (आयसीएचआर) सांगितले की, या विषयावर अनावश्यक वादविवाद होत आहे आणि पोस्टर्स असणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत नवीन रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये पंडीत नेहरूंचे चित्र असेल.
यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून गेल्या ७५ वर्षांत भारतीय इतिहासात देशासाठी योगदान दिलेल्या नेत्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली असून यात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची छायाचित्रच नसल्याने काँग्रेस पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून अनेकांना देखील ही बाब खटकलेली आहे. यामुळे या धोरणाविरुद्ध देशभरात वादंग उठले. भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेने (आयसीएचआर ) स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करण्यासाठी ‘आझादी के अमृत महोत्सव’ या सोहळ्यांमधून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चित्र काढून किंवा वगळून टाकल्यानंतर हा वाद उफाळून आला. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी ‘ आयसीएचआर ‘ वर टीका केली.
दरम्यान काही काँग्रेस नेत्यांनी आयसीएचआरच्या वेबसाईटच्या मुख्य पानाचा स्क्रीनशॉट शेअर केला असून त्यात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, नेताजी सुभाष बोस, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडीत मदन मोहन मालवीय, क्रांतीवीर भगत सिंग आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या मान्यवरांचे छायचित्र वैशिष्ट्यीकृत होते. पण पंडित जवाहरलाल नेहरूंचे चित्र त्यातून गायब होते. दरम्यान, आयसीएचआरच्या एका उच्च पदाधिकाऱ्याने या मुद्द्यावरील टीकेला उत्तर देत म्हटले की, “आम्ही स्वातंत्र्यलढ्यातील कोणाची भूमिका कमी करण्याचा प्रयत्न करत नाही.” तसेच आझादी का अमृत महोत्सव सोहळ्याचा भाग म्हणून प्रदर्शित होणाऱ्या अनेक पोस्टरपैकी एक पोस्टर आहे. तथापि, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, पंडीत नेहरूंचे चित्र हे जाणीवपूर्वक पोस्टरमध्ये समाविष्ट केले गेले नाही. विशेष म्हणजे आयसीएचआर ही शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था असून आझादीच्या अमृत महोत्सव उत्सवाअंतर्गत स्वातंत्र्य संग्रामाच्या थीमवर कार्यक्रम केले जात आहेत.