पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्व वारकऱ्यांना आता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाची आस लागली असून सर्वांचे पाय पंढरपूरच्या दिशेने धावत आहेत, परंतु आषाढी एकादशीला अद्याप बराच काळ असला तरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांची प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली दिसून येते. इतकेच नव्हे तर दर्शन बारी रांगेत देखील मोठ्या प्रमाणात वारकरी उभे राहिलेले दिसून येतात. गेली दोन वर्ष निर्बंधांमध्ये आषाढी वारी पार पडत होती. यंदा मात्र निर्बंधमुक्त वारी पार पडणार आहे. दोन वर्षानंतर होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी देशभरातून हजारोंच्या संख्येनं भाविक सध्या पंढरपूरकडे येत आहेत.
आषाढी एकादशीला आठवड्याचा अवधी असताना आताच पदस्पर्श दर्शनाची रांग थेट गोपाळपूर येथे उभारलेल्या पत्राशेडमध्ये पोहोचली आहे. पालखी सोहळे पंढरपूर नजीक आल्यावर दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचत असते, यंदा मात्र अजून पालख्या जिल्ह्यात येण्यापूर्वीच भाविकांच्या गर्दीने विक्रम गाठला आहे. त्यामुळे यंदा विक्रमी यात्रा भरणार असल्याचे दिसत आहे.
पंढरपूरात विठुरायाच्या दर्शनाची रांग मंदिराजवळील सात माजली दर्शन मंडपातून विणे गल्ली माहे चंद्रभागा तीरावरून गोपाळपूर येथे उभारलेल्या १० पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे. या पत्राशेडच्या पुढे जवळपास ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्वेरि इंजिनियरिंग कॉलेजपर्यंत बांबूचे शेड बांधून दर्शन रांग तयार करण्यात आली आहे. गरज भासल्यास ही लांबी अजून वाढवण्यात येणार आहे. या दर्शन रांगेवर पत्र्याचं आवरण घातल्यानं पावसातही भाविक भिजणार नाहीत.
विशेष म्हणजे यात्रेच्या शेवटच्या तीन दिवसांत दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाला चहा, नाश्ता भोजन देण्याची व्यवस्था मंदिर समितीनं केली आहे. यासाठी दोन मोठे देणगीदार पुढे आले असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले आहे. सध्या दर्शन रांगेत पन्नास हजारांपेक्षा जास्त भाविक असून आजपासून दर्शनासाठी ८ ते १० तास एवढा कालावधी लागणार आहे.
एकीकडे आषाढीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे मंदिर समिती कायद्यानुसार, नवीन समिती स्थापन करेपर्यंत मंदिरावर प्रशासक सभापती म्हणून आता जिल्हाधिकाऱ्यांना पदभार सांभाळावा लागणार आहे. मंदिर समितीच्या कायद्यानुसार नियुक्त समितीची मुदत पाच वर्षाची असते.
तेव्हा अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच वर्षांपूर्वी ही समिती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमली होती. दि. ३ जुलै रोजी या समितीचा कार्यकाळ संपला आहे. पण सध्या अजून राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं नसल्यानं आषाढीपूर्वी नवीन समितीची निवड करणं अवघड आहे. अशा वेळी नियमानुसार, जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासक म्हणून कार्यभार सोपवण्याची तरतूद आहे. आता नवीन मुख्यमंत्र्यांना यासाठी विधी आणि न्याय विभागाकडून तातडीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.
शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे. ६ जूनला शेगाव येथून ही पालखी निघाली. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीचा आजचा मुक्काम सोलापूर या ठिकाणी असणार आहे. दोन दिवस पालखीचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यात होता.
माता रूक्मिणीच्या पालखीची सुरुवात ३ जून रोजी सुरु झाली. हा पालखी सोहळा कौंडण्यपूर येथून प्रस्थान करण्यात आला. त्यानुसार आज रात्री शेटफळ, ता. मोहोड, जि. सोलापूर येथे मुक्काम असणार आहे. उद्या ही पालखी सकाळी शेटफळ, ता. मोहोड, जि. सोलापूर येथून प्रस्थान करेल. तर, रात्री श्री. रेणुका विद्यालय, बाभूळगाव, सोलापूर येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.
यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे ३ जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज पालखी आष्टी मुक्कामी असणार आहे. तर उद्या पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे.
संत निवृत्तीनाथांच्या पालखी १३ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी निघाली. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी आज कंदर मुक्कामी असणार आहे. तर, उद्या रात्री दगडी अकोले येथे पालखीचा रात्रभर मुक्काम असणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मनसोक्त विठुरायाचे दर्शन पाहता येणार आहे.
संत नामदेव महाराज यांची पालखी १९जून रोजी नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे रवाना झाली. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी ही पालखी पंढरपूरला शेकडो वारकऱ्यांसह पायी प्रवास करत असते. मानाच्या पालख्यांपैकी एक म्हणून नरसी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या पालखीला विशेष महत्त्व आहे. पालखीचा रात्रीचा मुक्काम लहुळ येथे असणार आहे.
विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाला आहे त्यामुळे वारकऱ्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत तुकारामांच्या पालखीचा आज पालखीचा रात्रीचा मुक्काम अकलूज येथे असणार आहे.
दि. २१ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू आळंदीहून प्रस्थान करण्यात आले. या सोबत महाराष्ट्रातील अनेक पालख्या पायी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निगाल्या आहेतत. त्यानुसार पालखीचा आजचा रात्रीचा मुक्काम माळशिरस या ठिकाणी असणार आहे.
Pandharpur Yatra Devotees Crowd record Ashadhi Ekadashi