पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत. पण, त्यांना बडव्यांनी घेरले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बडव्यांबाबत वक्तव्य केले आहे. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील बडवे चर्चेत आले आहे. भुजबळांना नेमके कोणते बडवे म्हणायचे होते. विठ्ठल मंदिरातील बडवे कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्वाचा इतिहास नेमका काय आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले असून खरा पक्ष कुणाचा यावर वाद सुरू आहे. बुधवारी दोन्ही गटातील नेत्यांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यात अजित पवारांना साथ देणाऱ्या छगन भुजबळ यांनी शरद पवार विठ्ठल असून त्यांना तीन बडव्यांनी घेरले आहे, असे विधान केले. त्यांच्यापाठोपाठ जयंत पाटलांनी देखील बडव्यांच्या अनुषंगाने विधान केले. त्यांच्या या वक्तव्यांनी बडवे कोण, बडव्यांचा इतिहास आदींवर चर्चा होऊ लागली आहे. महाराष्ट्राला बडवे हा शब्द वा घटक नवीन नाही. पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात असलेले बडवे पूर्वीपासून प्रसिद्ध आणि गाजलेले आहे.
बडव्यांच्या वाढलेल्या प्रस्थामुळे त्यांच्यावर वेळोवेळी टीकादेखील झाली आहे. इतिहासाची पाने धुंडाळल्यास हे घराण्याचे नाव आहे. राजपूतांमध्ये देखील ‘बडवे’ घराणी आढळतात. ‘बडवे’ म्हणजे मोठे किंवा अधिक मान असणारे, सन्माननीय. अभंगांमध्येही बडवे या नावाचा उल्लेख आला आहे. काहींच्या मते, ‘बडवा’ हा शब्द ‘बरवा’ शब्दापासून आला असण्याची शक्यता आहे.
बडवे हे घराणे पंढरपूरचे आहे. म्हणजेच बडवे विठ्ठलाचे पुजारी. विठोबाची परंपरेने सेवा करणारे बडवे हे एक घर होते. त्यांचे आडनाव हे बडवे. हे घराणे कमीत कमी एक हजार वर्षांपासून म्हणजे ज्ञानेश्वरमाऊलींच्या आधीपासून पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करत असल्याचे पुरावे देखील सापडतात. याच घराण्याकडे पांडुरंगाच्या पूजेचा मान होता. प्रल्हाद महाराज बडवे यांच्यासारखे महंतदेखील या घराण्यात झाले आहेत. जेव्हा पंढरपूर शहरावर नैसर्गिक संकट आले, हल्ले झाले, तेव्हा बडवे यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण केले. बडवे हे पंढरपूरच्या मंदिरातील पूजेसह पंढरपूरच्या मंदिराचे नित्योपचार करणे, व्यवस्थापन बघणे, अशी कामे करीत.
संतांनी देखील केलीय टीका
धांव घाली विठू आतां चालूं नको मंद ।
बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ।।
असे म्हणत संत चोखामेळा यांनी बडव्यांकडून होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली आहे. या घराण्याने मंदिराचे व्यवस्थापन बघत असताना हळूहळू विठ्ठल मंदिरावर मक्तेदारी दर्शवण्यास सुरुवात केली, असे देखील म्हटले जाते.