पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अधिक मास अर्थात पुरुषोत्तम महिन्यात दानधर्म करावा, नदीवर जाऊन स्थान करावे यामुळे पुण्य मिळत असल्याची धारणा हिंदू धर्मात आहे. त्या अंतर्गत यंदा पंढरपूर येथील चंद्रभागेवर स्थान करून विठूमाउलीचे दर्शन करणाऱ्या भाविकांचा महापूर दिसून आला आहे. आजवरचा इतिहास पाहता यावर्षी अधिक महिन्यात सर्वाधिक भावकांची नोंद करण्यात आली आहे.
१८ जुलै ते १६ ऑगस्टदरम्यान अधिक मास होता. त्यानुसार महिनाभर विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. याच महिन्यात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. तसेच नदीकाठी जाऊन स्नान करून पूजाविधी करण्यात येतो. यामुळे पुण्य लाभत असल्याची मान्यता आहे. या पार्श्वभूमीवर रोज साधारण साडेतीन ते चार लाख भाविक अधिकाची पर्वणी साधण्यासाठी पंढरपुरात आलेत. या महिन्यातील दोन्ही एकादशीला आषाढी एकादशीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली. पंढरपूरला रोज येणारे भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून सोबत आणलेले दिव्याचे वाण अर्पण करून दर्शनासाठी रांगेत लागत.
आजवरच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने कधीच भाविक महिनाभर रोज आलेली नोंद नसून या महिनाभरात एक कोटीपेक्षा जास्त भाविकांनी पंढरपुरात येऊन चंद्रभागेचे पवित्र स्नान केले. यात कित्येक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी रोज शेकड्याच्या संख्येने भाविकांना पंढरपूरची वारी घडवत पुण्य मिळवले. या अधिक महिन्यामध्ये जवळपास साडेसात ते आठ लाख भाविकांना देवाच्या पायावर दर्शन घेण्याचे भाग्य लाभले तर १३ लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन घेता आले. यातील बहुतांश भाविकांनी नामदेव पायरीचे किंवा विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आपला अधिक मास पूर्ण केला.
सलग सुट्ट्यांचा चांगला परिणाम
अधिक महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी दिसून आली. पुरुषोत्तम मासाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना सलग सुट्ट्या आल्याने पंढरपूर भाविकांनी गजबजून गेले होते. दर तीन वर्षांनंतर येणारा अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास हा वारकरी संप्रदायाची पर्वणीच काळ मानण्यात येतो. मात्र यावर्षीचा अधिक महिना हा पंढरपूरच्या इतिहासातील सर्वात जास्त गर्दीचा महिना ठरला. याचा लाभ येथील दुकानदारांनादेखील झाला.
Pandharpur Purushottam Adhik Mas Devotees Record History