इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंढरपूरः निवडणूक आचारसंहितेमुळे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. या वेळी लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील भाविक दाम्पत्य बाबुराव सगर आणि सागरबाई या मानाच्या वारकरी दाम्पत्याला शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. त्यांना हा मान मिळताच आनंदाश्रू आवरता आले नाहीत.
दरवर्षी प्रथेप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री हे कार्तिकीची शासकीय महापूजा करत असतात; मात्र सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने पुण्याचे महसूल आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते ही महापूजा करण्यात आली. कार्तिकी सोहळ्यासाठी सहा लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. संपूर्ण पंढरी नागरी विठुनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती.
विठुरायाच्या महापूजेसाठी मानाचे वारकरी ठरलेले सगर कुटुंबीय हे गेल्या १४ वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत. गवंडी काम करून ते आपला चरितार्थ चालवतात. आज कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पहाटे सुरुवातीला होणारी देवाची नित्यपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तर देवाची पाद्यपूजा व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पार पडली. यानंतर पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी. पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली.
पांडुरंगाच्या कृपेनेच आपल्याला ही महापूजा करण्याचे भाग्य लाभले. योगायोगाने आचारसंहिता सुरू असल्याने शासनाचा आदेश मिळाला आणि हा महापूजा करण्याचा मान मिळाल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आयुष्य सुखकर होवो, त्यांना चांगले आरोग्य लाभो, आनंदमयी जीवन होवो, असे साकडे विठुरायाला घातल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक शांततेने पार पडावी ही मनातील सुप्त इच्छा पांडुरंग चरणी मांडली; मात्र मला खात्री आहे, की महाराष्ट्रातील निवडणूक नेहमीच शांततेने पार पडते, असे ते म्हणाले. मी बालपणापासून देवाच्या दर्शनाला येतो. प्रत्येक वेळी एक वेगळे समाधान आणि आनंद विठ्ठल दर्शनाने मिळतो; मात्र या वेळी तो खूपच खास होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कार्तिकी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होते. आपल्या लाडक्या माउलीचे गोजिरे साजिरे रूप डोळ्यांत साठवण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली होती. पुणे येथील भक्त राम जांभूळकर यांनी विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.