पंढरपूर – कोरोना काळात सगळीच धार्मिक स्थळे बंद आहेत. त्याला पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिरही अपवाद नाही. तरीही कामिका एकादशीनिमित्त बुधवारी (४ ऑगस्ट) पंढरपूरला जवळपास पन्नास हजार भाविक दाखल झाले आहेत. मंदिर बंद असल्याने भाविक चंद्रभागेत स्नान करून संत नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. एकच गर्दी झाल्याने प्रशासनाकडून मंदिर परिसरात तसेच प्रदक्षिणा मार्गावर सर्व भाविकांची कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही पोलिसांकडून दिल्या जात आहेत.
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना दर्शन घेता आले नसल्याने अनेक भाविकांनी कामिका एकादशीला गर्दी केली. तब्बल ५० हजार भाविक आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कामिका एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये वेगळे महत्त्व असल्याने भाविकांनी आजचा मुहूर्त साधला. मात्र कोरोना निर्बंधांमुळे मंदिर बंद आहे. मंदिर परिसरातही प्रसाद विक्रीची दुकाने लावण्यात आली आहेत. आमदार प्रशांत परिचारक यांनी भाविकांची कोरोना चाचणी करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाकडून मंदिर परिसरात तसेच प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची कोरोना चाचणी केली जात आहे.