विशेष प्रतिनिधी, पुणे/पंढरपूर
पाच राज्यांच्या निकालाची धामधुम सुरू असताना राज्यातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचाही निकाल आज जाहीर झाला. भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके पिछाडीवर असून, ते पराभवाच्या छायेत आहेत.
पंढरपूरमध्ये सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपकडून समाधान आवताडे आणि महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात थेट सामना झाला. सकाळपासूनच दोघांमध्ये अटीतटीची लढत पहायला मिळाली. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत झालेल्या ३६ व्या फेरीपर्यंत समाधान आवताडे यांना १,०४,२८५ मते मिळाली तर भगीरथ भालके १,००,१८३ यांना मते मिळाली आहेत. समाधान आवताडे ४ हजार १०३ मतांनी आघाडीवर आहेत. यात आवताडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे पोटनिवडणूक लागली होती. भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली. त्याशिवाय स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील, अपक्ष उमेदवार शैला गोडसे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात होते.
प्रचारासाठी दिग्गजांची मांदियाळी
पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेमध्ये झालेली गर्दी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन हा चर्चेचा विषय ठरला होता. भाजपकडूनही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर दिग्गज नेत्यांनी प्रचारसभा घेऊन निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या नजरा या निकालाकडे लागल्या होत्या.
(मतमोजणीच्या अद्याप दोन फेऱ्या बाकी असून त्यानंतर निकाल जाहिर होणार आहे)