इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूर : कार्तिक शुद्ध एकादशीनिमित्त कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दोन लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाल्याची माहिती पेालिसांनी दिली. दरम्यान, यंदा कार्तिक आषाढी यात्रेतील शासकीय महापूजेचा मान पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना मिळाला आहे. त्यांच्यासोबत मानाचे वारकरी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, दरवर्षी कार्तिक यात्रेतील शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो; मात्र यंदा आचारसंहिता असल्याने उपमुख्यमंत्र्यांऐवजी महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना मिळाला असल्याचे मंदिर समितीने सांगितले. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढत आहेत. पालख्यांचे आगमन होत आहे. ६५ एकर परिसरात वारकरी मोठया संख्येने दिसून येत आहेत. पंढरपूर शहरात गर्दी वाढत असून विठ्ठलाची दर्शनरांग पत्राशेडपर्यंत गेली आहे.
कार्तिक वारीत पोलिस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी एक हजार ६२६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये अवजड वाहतुक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे. वाहतूक नियमनासाठी १३ ठिकाणी डायव्हरशन पॉईट सुरू करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण येथे तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.