इंडिया दर्पण विशेष लेखमाला
महिमा ‘पंढरीच्या वारी’ चा! (भाग १)
संत निवृत्तीनाथ महाराज
यावर्षी २९ जून रोजी आषाढ़ी एकादशी आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम यांच्या सह सर्व पालख्यांचे पंढरपुरकड़े प्रस्थान झाले आहे. हे निमित्त साधून पंढरीची वारी आणि वारकरी संप्रदाय यांचे स्मरण करण्याचा संकल्प करीत आहे. याचनिमित्ताने आपण महाराष्ट्रातील विविध साधु-संतांचा महिमा जाणून घेणार आहोत….
वारकरी संप्रदायाचा इतिहास
हा संप्रदाय नेमका केव्हा उगम पावला, हे सांगता येत नाही. संत बहिणाबाईनी (१६२८-१७००) ‘संतकृपा जाली । इमारत फळा आली’ ह्या आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटले आहे,
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया
नामा तयाचा किंकर । तेणे रचिले तें आवार
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत
तुका जालासे कळस । भजन करा सावकाश
इ.स. १२६० पूर्वी अनेक शतके पंढरपूरचा तीर्थमहिमा गाजत होता आणि भक्त पुंडलिकाची कथा तेव्हाही प्रसिद्ध होती. ह्यावरून हे मंदिर फार पुरातन असले पाहिजे आणि वारकरी पंथही बराच प्राचीन असला पाहिजे, असा निष्कर्ष निघतो. ह्या पार्श्वभूमीवर ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ ह्या ओळीचा अर्थ पाहिला, तर ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, ह्याचा अर्थ ह्या संप्रदायाला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाचे अधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले, तसेच त्यांच्या रूपाने ह्या संप्रदायाला चैतन्याचा एक महास्त्रोत येऊन मिळाला, असा घेता येईल.
वारकरी कुणाला म्हणावे?
वारकरी हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय आहे. ‘वारी करणारा’ ह्या अर्थाने ‘वारकरी’ हा शब्द वापरण्यात आलेला आहे. ‘वारी’ ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो, हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या-मग ती कोणतीही असो-यात्रेला जो नियमितपणे, एक व्रत म्हणून जातो, तो ‘वारकरी’ असे म्हणता येईल.
येरझारांमध्ये जी वारंवारता आहे,तीही येथे अभिप्रेत आहे. तथापि वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे,तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही.
वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस-श्रीविठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात. त्यांतही आषाढीला महत्त्व विशेष आहे. ज्यांना वर्षातून एकदाच-म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला-येणे शक्य असते, त्यांनी तसे केले तरी चालते; परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे, ही वारकऱ्यांची मुख्य साधना होय.
श्रीज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशीस वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीलाही नियमाने जमू लागले. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तिनाथांना लाभला. तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला.
ज्ञानेश्वरांनी जरी वारकरी संप्रदायाचा पाया रचला तरी त्यांचे मार्गदर्शक होते त्यांचे गुरु संत निवृत्तिनाथ.निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. संत निवृत्तिनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य ११ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. आज तो दिवस आहे. त्यामुळे वारी पंढरीची मध्ये पहिले नमन गुरुश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांना करू या!
निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.
निवृत्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ असे सांगितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) लिहून काढली.
गहिनीनाथ हे निवृत्तिनाथांचे गुरू होते.
‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हाचि होय । गहिनीनाथे सोय दाखविली ॥’,
असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हटले आहे. सुमारे ३७५ अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना, निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे असे म्हणता येईल.. योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथापि निवृत्तिनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून आहे. त्यांनी ‘आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले’ असे निवृत्तिनाथां बद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वरांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तिनाथ त्यांच्या सोबत होतेच. ‘निवृत्तिदेवी’, ‘निवृत्तिसार’ आणि ‘उत्तरगीता टीका’ असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. रा. म. आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ निवृत्तिनाथांचाच आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्री समर्थवाग्देवता मंदिरात ‘सटीक भगवद्गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेवलेली आहेत.
ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली, व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे. निवृत्तिनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ वद्य एकादशीला असते २३ जुन १२९७.
संत निवृत्तिनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य ११ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तिनाथांना लाभला. तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला.
या चारहि भावंडानी आपल्या अभंग रचनेच्याद्वारां पंढपुरचीवारी करून सर्व समाजाचे प्रबोधन केले. यामध्ये श्री निवृत्तिनाथांनी सुमारे ३५७ अभंगाची रचना केली आहे. अशाप्रकारे वारकरी संप्रदायाची बैसका श्री निवृत्तिनाथमहाराजांनी बसवली व श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी या संप्रदायाचा पाया रचला.
शेवटी श्री निवृत्तिनाथांनी आपल्या हातांनी भगवान् पांडुरंगाच्या उपस्थितींत श्री ज्ञानेश्वर महाराजांना कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२१८ रोजी आळंदी येथे संजीवन समाधि दिली. त्यानंतर मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके १२१८ रोजी सोपान महाराजांना श्रीक्षेत्र सासवड येथे संजीवन समाधि दिली. त्यानंतर वैशाख वद्य दशमीचे दिवशी तापी तिरावर भुसावळ जवळ एदलाबाद (मुक्ताईनगर) येथे श्री मुक्ताबाई आकाशांत गुप्त झाल्या. सरते शेवटी जेष्ठ वद्य द्वादशी शके १२१९ रोजी भगवान् पांडुरंगाने स्वतः श्री निवृत्तिनाथ महाराजांना श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधि दिली.
धन्य धन्य निवृत्ति देवा । काय महिमा वर्णावा ।। 1 ।।
शिवे अवतार धरून । केले त्रैलोक्य पावन ।। २ ।।
समाधि त्र्यंबकशिखरी । मागे शोभे ब्रह्मगिरी ।। ३ ।।
निवृत्तिनाथांचेि चरणी । शरण एका जनार्दनी ।। ४ ।।
– (श्री एकनाथमहाराज अभंग गाथा)
संत निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीस त्रंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आल्यानंतर ही बाब प्रकाशझोतात आली. नंतरच्या काळात संत निवृत्तीनाथ महाराजांनी त्रंबकेश्वर येथे समाधी घेतली हे जरी सर्वांना ज्ञात होत तरीही संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी एवढया घनदाट जंगलात नक्की कुठे आहे हे कुणालाच ज्ञात नव्हतं.. नंतर इ स 1810-1825 च्या आसपास (नक्की वर्ष ज्ञात नाही) जोपुळ ता दिंडोरी येथील महान संत ‘पाटीलबुवा रखमाजी उगले’ महाराज यांनी इतर काही समकालीन संतांच्या मदतीने संत निवृत्तीनाथांची समाधी शोधून काढली. त्यामुळे संत पाटीलबाबा जोपुळकर यांना संत निवृत्तीनाथ महाराज समाधी शोधक म्हणून गौरवले जाते. संत पाटील बाबांनीच निवृत्तीनाथांचं छोटस मंदिर सुमारे 200 वर्षांपूर्वी बांधले. संत पाटीलबाबा महाराजांनी जोपुळहुन त्रंबकेश्वर पायी वारी पौष महिन्यात सुरू केली. हीच पौष वारी म्हणून प्रसिद्ध आहे.
निवृत्तिनाथांवरील मराठी पुस्तके
श्री संत निवृत्तीनाथ चरित्र (बाळकृष्ण लळीत)
परब्रह्म – (संत निवृत्तिनाथांवरील पहिली कादंबरी) लेखिका सौ. गायत्री मुळे, नागपूर -प्रकाशक – लोकव्रत प्रकाशन, पुणे
-विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७