नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक ते मुंबई पंचवटी एक्सप्रेस प्रवासादरम्यान चेअर कार मधील पास धारकांकडून होत असलेल्या दादागिरी बद्दल प्रवाश्याने थेट रेल्वे मंत्र्यांकडे दाद मागितली आहे. या गाडीच्या चेअरकार मधील सुमारे ४० टक्के सीट खाली राहत असल्याने रेल्वेला किमान ५ लाखांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा आहे. त्यामुळे वेटिंग लिस्ट धारकांना देवळाली स्टेशननंतर खाली असलेले सिट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.
सदर प्रवाश्याने नाशिक ते मुंबई प्रवासादरम्यान पास धारकांकडून वारंवार होत असलेल्या दादागिरी बद्दल रेल्वे मंत्र्यांकडे आवाज उठविला आहे. याबाबत त्यांनी १२११० मनमाड – छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे प्रवासात C2 मासिक सिझन तिकिट (MST) धारक डब्यात सिट रिकामे असल्यास (AC CC) C1 चेअर कार मधील वेटिंग लिस्ट तिकीट धारकांना देवळाली स्टेशन नंतर खाली असलेले सिट मिळण्याची मागणी केली आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, नाशिककरांना मुंबई प्रवासासाठी सोयीच्या असलेल्या पंचवटी एक्सप्रेस 12110/12109 च्या AC CC चेअरकार मासिक / त्रैमासिक पास धारकांच्या C2 बोगी मध्ये आठवड्यातील चौदा फेऱ्या पैकी केवळ सोमवारी नाशिक – मुंबई आणि शुक्रवारी मुंबई – नाशिक या केवळ दोन फेरी प्रवासात पास धारकांच्या सर्व सीट्स भरलेल्या असतात. आठवड्यातील ७ दिवसांच्या दुहेरी प्रवासात केवळ वर उल्लेख केलेल्या दोन वेळा MST CC बोगी मध्ये पूर्ण क्षमतेने पासधारक प्रवास करतात. कारण त्रैमासिक पासच्या प्रवासाची किंमत ही रोज तिकीट काढून प्रवास करण्याच्या तुलनेत १० टक्क्यांहून कमी आहे. (ज्या प्रवासास तीन महिन्याच्या तिकिटासाठी 68,400 ₹ लागतात तोच प्रवास पासधारक केवळ 6500₹ मध्ये करतात.) या किमतीत रेल्वे बोगी विकत घेतल्याचा आविर्भाव काही प्रवसादरम्यान संकुचित मानसिकता दाखविणारे प्रवासी करतात यामुळे पासधारक आणि रेल्वे प्रवासी यांच्यात वाद उत्पन्न होत असल्याचे म्हटले आहे.
रेल्वे प्रशासन आपल्या महसुलावर गेली वर्षानुवर्ष कसे पाणी फिरवत आहे याचे उदाहरण आजच्या एकेरी प्रवासात रेल्वे चा बुडलेला 9400 ₹ चा महसूल याची आकडेवारी संदर्भात दिला आहे तसेच त्याबाबत खुलासा पुढील बाबी समजून घेतल्यावर होईल असे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये पंचवटी एक्सप्रेस मधील C2 बोगीतील एकूण आसन क्षमता एकूण 72 आहे. या मध्ये नाशिक – मुंबई प्रवासादरम्यान प्रवास करणारे शासकीय कर्मचारी, व्यापारी, खासगी क्षेत्रात काम करणारे मोठ्या प्रमाणात पास १० टक्के तिकिटाच्या रकमेत मिळतो म्हणून काढतात मात्र प्रवास करत नाहीत. यामुळे पंचवटी AC CC पासधारकांची चाळीस टक्के बोगी गेली वर्षानूवर्ष रिकामी जाते, सद्यस्थितीत पासधारकांच्या दादागिरी मुळे रेल्वे प्रशासन वेटिंग तिकीट धारकाना या बोगीत सिट देवू शकत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मासिक पासधारकाचे नाशिक – मुंबई प्रवासात देवळाली नंतर जेवढे सीट रिकामे आहेत तेवढ्या जागा चेअरकार वेटिंग धारकाना दिल्यास रोज किमान 25 नाशिककराना केवळ ३८० रुपयात चेअरकार ने प्रवास करता येईल. यामुळे पासधारकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. पासधारकाना या बोगीत प्राधान्याने प्रवासाची सुविधा रेल्वेने द्यावी.
मात्र आठवड्यातील १४ पैकी केवळ ०२ वेळा पूर्ण क्षमतेने ही बोगी पासधारक वापरतात. उरलेल्या १२ वेळा नाशिककरांना सध्याच्या पासधारकांच्या साठी असलेल्या मात्र रोज रिकाम्या जाणाऱ्या सीट वरून प्रवास करता येईल, यामुळे रेल्वेच्या महसुलात लक्षणीय वाढ होईल. सदर सुविधा ही प्राधान्यक्रमाने वेटिंग तिकीट धारकाना त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्याना किंवा रेल्वे पासधारकाना द्यावी. वेटिंग तिकीट धारकांना सिट मिळाल्यानंतर ज्या साधे तिकीट धारकाना तिकीट अपग्रेड करून अर्थात प्रवासाच्या फरकाची रक्कम भरून रिकाम्या सिट वरून प्रवास करायचा आहे त्यांची देखील सोय यामुळे होणार आहे.
यामुळे रेल्वेचा होणारा महसुली तोटा कमी होवू शकतो. पर्यायाने रेल्वेच्या उत्पन्नात भर पडू शकते. यामुळे MST धारकांकडून सामान्य प्रवाश्यांवर होत असलेल्या नाहक दादागिरी ला ही आळा बसू शकतो. मागणीचा गांभीर्याने विचार करून रेल्वेच्या महसुलात होणारे नुकसान टाळण्यासाठी नियमावली तयार करावी, जेणे करून MST धारकांचे ही नुकसान होणार नाही आणि त्यांच्या दादागिरीला आळा बसेल. तसेच मुठभर पासधारकांच्या समोर मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या नाशिककर रेल्वे प्रवाश्यांची सोय रेल्वेने प्रथम पहावी. शिवाय MST धारकाच्या तुलनेत रेल्वेला तिकिटामधून अधिक महसूल मिळणार असल्याचे रवींद्र अमृतकर यांनी निवेदनात म्हटले आहे.